Friday, October 24, 2025
Happy Diwali

बारावीच्या विद्यार्थ्याने एकतर्फी प्रेमातून शिक्षिकेवर पेट्रोल टाकून पेटवले

बारावीच्या विद्यार्थ्याने एकतर्फी प्रेमातून शिक्षिकेवर पेट्रोल टाकून पेटवले

भोपाळ: एकतर्फी प्रेमातून एका १८ वर्षीय विद्यार्थ्याने आपल्या २६ वर्षीय शिक्षिकेवर पेट्रोल टाकून तिला पेटवून दिल्याची धक्कादायक घटना मध्य प्रदेशमधील नरसिंहपूर जिल्ह्यात घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी विद्यार्थी सूर्यांश कोचर हा बारावीत शिकतो, तर पीडित शिक्षिका स्मृती दीक्षित आहेत. दोघांची ओळख गेल्या दोन वर्षांपासून होती. स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात सूर्यांशने स्मृती यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी केली होती, ज्याची तक्रार स्मृती यांनी शाळा प्रशासनाकडे केली. या तक्रारीमुळे चिडून जाऊन सूडाच्या भावनेने सूर्यांशने हा हल्ला केला.

ही घटना सोमवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली. आरोपी पेट्रोलची बाटली घेऊन शिक्षिकेच्या घरी गेला आणि तिच्यावर पेट्रोल शिंपडून तिला पेटवून दिले. त्यानंतर तो घटनास्थळावरून फरार झाला. स्मृती यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्या १० ते १५ टक्के भाजल्या असून, सुदैवाने त्यांच्या जीवाला कोणताही धोका नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली.

पोलीस अधिकारी मनोज गुप्ता यांनी सांगितले की, "एकतर्फी प्रेम आणि सूडाच्या भावनेतून सूर्यांशने थंड डोक्याने हा कट रचला होता." फरार झालेल्या सूर्यांशला पोलिसांनी डोंगरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कल्याणपूर गावातून अटक केली आहे. त्याच्यावर भारतीय न्याय संहितेच्या कलम १२४ सह अन्य कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून, सध्या तो पोलीस कोठडीत आहे. या घटनेची पुढील चौकशी सुरू आहे.

Comments
Add Comment