Tuesday, August 19, 2025

Mumbai Filterpada Powai : पाय घसरला आणि थेट नाल्याच्या प्रवाहात; फिल्टरपाड्यातील युवकाचा जीवघेणा प्रसंग

Mumbai Filterpada Powai : पाय घसरला आणि थेट नाल्याच्या प्रवाहात; फिल्टरपाड्यातील युवकाचा जीवघेणा प्रसंग

मुंबई : मुंबईत मुसळधार पावसाने अनेक ठिकाणी धोकादायक परिस्थिती निर्माण केली आहे. अशातच पवईतील फिल्टर पाडा परिसरात एक हृदयद्रावक घटना घडली. पवई फुलेनगर भागात मंगळवारी सकाळी एका युवकाला पुराच्या पाण्याचा फटका बसला आणि तो वाहून गेला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, पावसाचे पाणी अतिशय वेगाने वाहत होते. त्या जोरात हा युवक वाहून गेला. नागरिकांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला, परंतु तो हातातून सुटून पुढे निघून गेला. मात्र, पुढे काही अंतरावर स्थानिकांनी आणि बचाव पथकाने शर्थीचे प्रयत्न करून त्याला सुरक्षित बाहेर काढले. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. सुदैवाने, वेळेत मदत मिळाल्यामुळे युवकाचा जीव वाचला. प्रशासनाने नागरिकांना अशा परिस्थितीत धोकादायक प्रवाहात न जाण्याचे आवाहन केले आहे.



या व्हिडिओमध्ये तो तरुण पाण्याच्या प्रवाहासोबत वाहताना दिसतो, यावरून दिसून येते की पाण्याचा प्रभाव किती मोठा आहे. पाण्याच्या ठिकाणी कोणीही धोकादायक परिस्थितीत जाऊ नये, परिसरात देखील जाणं टाळावं असं सांगितलं असलं तरी काहीजण धोकादायक परिस्थितीतही जाताना दिसतात, अशातच या घटनेची चर्चा होताना दिसत आहे. पवईतील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर घडलेल्या घटनेचा एक थरारक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये एक तरुण जोरदार प्रवाहात वाहत जाताना स्पष्टपणे दिसतो. पाण्याचा वेग किती प्रचंड आहे, याची कल्पना या दृश्यांवरून सहज करता येते. नागरिकांना वारंवार प्रशासनाकडून सूचना देण्यात आल्या आहेत की, पुराच्या पाण्यात किंवा प्रवाहाच्या ठिकाणी जाणे टाळावे, मात्र तरीही काहीजण धोक्याची पर्वा न करता अशा ठिकाणी जाताना दिसत आहेत. त्यामुळेच पवईतील ही घटना मोठ्या चर्चेचा विषय ठरली आहे. स्थानिक प्रशासन आणि बचाव पथकाने यावर भर दिला आहे की, पावसाळ्यातील वेगवान पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज घेणे अवघड असते. अगदी क्षणभराचा निष्काळजीपणा जीवावर बेतू शकतो. त्यामुळे नागरिकांनी सुरक्षिततेच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असा पुनःपुन्हा सल्ला दिला जात आहे.




नेमकं काय घडलं?


मुसळधार पावसामुळे मिठी नदीचा प्रवाह अतिशय प्रचंड झाला असून, नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर पाणी साचलेले असताना, एक तरुण दुर्दैवाने या पुराच्या पाण्यात वाहून गेला. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, हा तरुण पावसाने भरलेल्या रस्त्यावरून जात असताना अचानक पाय घसरून थेट पाण्याच्या प्रवाहात पडला. स्वतःचा जीव वाचवण्यासाठी त्याने तातडीने एका भिंतीला असलेल्या लोखंडी सळईला पकडले होते. मात्र पाण्याचा वेग इतका जोरदार होता की, त्याच्या हातून ती सळई निसटली आणि तो प्रवाहासोबत पुढे वाहून गेला. दरम्यान, स्थानिक लोकांनी आणि बचावकार्यकर्त्यांनी धाव घेत त्याला वेळेत बाहेर काढण्यात यश मिळवले. सुदैवाने हा तरुण सुरक्षित आहे आणि उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या घटनेनंतर पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे की, पुराच्या पाण्याचा धोका अत्यंत गंभीर आहे. महानगरपालिकेकडून वारंवार सूचना देण्यात येत आहेत की, अशा ठिकाणी जाणे टाळावे. तरीदेखील दुर्लक्ष केल्यास जीवावर बेतू शकते, याची ही घटना ठळक जाणीव करून देते.




मिठी नदीची पातळी ओसरली; कुर्ल्यातील ३५० नागरिकांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर


मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मिठी नदीने धोक्याची पातळी गाठली होती. नदीची पातळी तब्बल ३.९ मीटरपर्यंत वाढल्याने परिसरात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली. संभाव्य धोका लक्षात घेऊन बृहन्मुंबई महानगरपालिकेने तात्काळ उपाययोजना केल्या. या अंतर्गत क्रांतीनगर आणि कुर्ला परिसरातील सखल भागांमधील सुमारे ३५० नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले. या नागरिकांना सुरक्षिततेसाठी मगन नथुराम महानगरपालिका शाळेत तात्पुरता निवारा देण्यात आला असून, त्यांच्या अन्नपाण्याची संपूर्ण व्यवस्था महापालिकेने केली आहे. दरम्यान, समुद्रातील भरती ओसरू लागल्यानंतर मिठी नदीची पातळीही कमी होऊ लागली आहे. पूर्वीची ३.९ मीटर पातळी आता ३.६ मीटरवर आली आहे. त्यामुळे परिस्थिती आटोक्यात येत असल्याचे संकेत मिळत आहेत. मुंबईकरांना महानगरपालिका प्रशासन आणि पोलिसांकडून सातत्याने सूचना दिल्या जात आहेत. पुराचा धोका कायम असल्याने नागरिकांनी या सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Comments
Add Comment