मुंबई: गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई आणि आसपासच्या परिसरात जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. हवामान विभागाने (IMD) दिलेल्या अतिवृष्टीच्या (रेड अलर्ट) इशाऱ्यानंतर मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पालघर, रायगड आणि कल्याण-डोंबिवली परिसरातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना आज (१९ ऑगस्ट, २०२५) सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
मुसळधार पावसाचा परिणाम:
रस्ते वाहतूक ठप्प: मुंबईतील अनेक सखल भागांमध्ये पाणी साचले आहे. कुर्ला, सायन, किंग्ज सर्कल, हिंदमाता, चेंबूर आणि अंधेरी सबवे येथे मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे रस्ते वाहतूक मंदावली आहे. त्यामुळे नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. अनेक ठिकाणी बेस्टच्या बस वाहतुकीचे मार्ग बदलण्यात आले आहेत.
रेल्वे सेवा विस्कळीत: मुंबईची जीवनवाहिनी मानली जाणारी लोकल सेवाही पावसामुळे विस्कळीत झाली आहे. मध्य आणि हार्बर मार्गावरील रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने गाड्या उशिराने धावत आहेत, तर काही लोकल सेवा रद्द करण्यात आल्या आहेत.
विमानसेवा प्रभावित: मुसळधार पाऊस आणि कमी दृश्यमानतेमुळे मुंबई विमानतळावरील विमान उड्डाणे आणि लँडिंगवरही परिणाम झाला आहे. अनेक विमाने रद्द करण्यात आली आहेत, तर काही विमाने इतर शहरांतील विमानतळांकडे वळवण्यात आली आहेत.
किती पाऊस
१८ ऑगस्ट सकाळी ८.३० वाजल्यापासून ते १९ ऑगस्ट सकाळी ५.३० वाजेपर्यंत मुंबईत किती पाऊस
विक्रोळी-194.5 मिमी
सांताक्रुझ-185.0 मिमी
जुहू-173.5 मिमी
भायखळा-167.0 मिमी
वांद्रे-157.0 मिमी
कुलाबा-79.8 मिमी
महालक्ष्मी-71.9 मिमी
सरकारकडून परिस्थितीचा आढावा:
राज्याचे मुख्यमंत्री आणि प्रशासनाकडून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील पावसाच्या स्थितीचा आढावा घेतला असून, मदत आणि बचाव कार्यासाठी संबंधित यंत्रणांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत. नागरिकांनाही आवश्यक नसल्यास घराबाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कोणत्याही आपत्कालीन मदतीसाठी मुंबई महानगरपालिकेच्या १९१६ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.