Thursday, September 18, 2025

Mumbai airport bust fire : मुंबई विमानतळावर इंडिगो बसला आग, अग्निशमन दलाचे त्वरित नियंत्रण

Mumbai airport bust fire : मुंबई विमानतळावर इंडिगो बसला आग, अग्निशमन दलाचे त्वरित नियंत्रण

मुंबई : मुंबई विमानतळावर मंगळवारी (१९ ऑगस्ट) दुपारी प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या बसला आग लागल्याची घटना घडली. दुपारी १२ ते १ वाजण्याच्या सुमारास ही घटना विमानतळाच्या डोमेस्टिक टर्मिनल टी-१ वर घडली. इंडिगो एअरलाईन्सच्या प्रवासी बसच्या पुढील भागाला अचानक आग लागली. मात्र, सुदैवाने मोठा अनर्थ टळला. विमानतळाच्या अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि काही वेळातच आगीवर नियंत्रण मिळवले. वेळीच कारवाई झाल्याने मोठी दुर्घटना टळली. या घटनेमुळे काही काळ विमानतळ परिसरात हलकासा गोंधळ उडाला होता.

अग्निशमन दलानं वेळीच विझवल्या ज्वाळा

दुपारी साधारण १२.३० च्या सुमारास टर्मिनल टी-१ वर प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या इंडिगो एअरलाईन्सच्या बसच्या पुढील भागाला अचानक आग लागली. सुदैवाने, या बसमध्ये त्यावेळी कोणताही प्रवासी नव्हता. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. विमानतळावरील अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि आगीवर नियंत्रण मिळवले. या घटनेचा हवाई सेवांवर किंवा विमानांच्या वेळापत्रकावर कोणताही परिणाम झाला नाही. त्यामुळे प्रवासी आणि विमान कंपन्यांना दिलासा मिळाला आहे.

मुंबई विमानतळावर इंडिगो बसला आग

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर मंगळवारी घडलेल्या इंडिगो बसला लागलेल्या आगीच्या घटनेनंतर विमानतळावर इतर सर्व विमाने नेहमीप्रमाणे सुरळीत सुरू राहिली. प्रवाशांच्या सुरक्षेला बाधा न येता हवाई वाहतूक सुरू असल्याचा दिलासा विमानतळ प्रशासनाने दिला आहे. तथापि, या घटनेबाबत विमानतळ अधिकाऱ्यांकडून अद्याप सविस्तर आणि अधिकृत माहिती जाहीर करण्यात आलेली नाही. याआधीच, शनिवारी (१६ ऑगस्ट २०२५) मुंबई विमानतळावर आणखी एक गंभीर प्रसंग टळला होता. इंडिगो एअरलाइन्सच्या एअरबस A३२१ या विमानाचा मागील भाग धावपट्टीवर आदळला होता. सुदैवाने त्यावेळीही मोठा अपघात टळून प्रवासी सुखरूप राहिले होते.

सुरक्षित लँडिंगनंतर चौकशी सुरू

खराब हवामानामुळे इंडिगो एअरबस ए३२१ विमानाने मुंबई विमानतळावर कमी उंचीवर फिरण्याची प्रक्रिया केली, त्याच वेळी धावपट्टीवर एक आकस्मिक घटना घडली. मात्र, वैमानिकाने धैर्यपूर्वक विमान सुरक्षितपणे उतरवले, ज्यामुळे प्रवाशांना कोणतीही बाधा झाली नाही. एअरलाइनच्या प्रवक्त्याने सांगितले की, विमानाच्या सुरक्षित लँडिंगनंतर मानक प्रोटोकॉलनुसार चौकशी व दुरुस्ती प्रक्रिया केली जाईल. विमानास पुन्हा कार्यान्वित करण्यासाठी नियामक परवानगी आवश्यक आहे. ही घटना विमानतळावर खराब हवामानामुळे घडलेली असून, प्रवाशांच्या सुरक्षेला कोणताही धोका झालेला नाही.

Comments
Add Comment