
मुंबई: मुंबईत सुरू असलेल्या संततधारेदरम्यान आज एक थराराक रेस्क्यू ऑपरेशन पार पडले. चेंबूर ते भक्तीपार्कदरम्यान धावणारी मोनोरेल्वे आज सायंकाळी ६.१५ मिनिटांच्या सुमारास अचानक बंद पडली. तांत्रिक बिघाडामुळे एसी बंद झाल्याने प्रवाशांना प्रचंड भीतीचे वातावरण पसरले होते. तसेच अनेक प्रवाशांना श्वसनाचा त्रासही जाणवला.
तब्बल दीड ते दोन तासांच्या अथक प्रयत्नांनतर मोनोरेलमधून सर्व प्रवाशांना बाहेर काढण्यात आले. हे रेस्क्यू ऑपरेशन संपले आहे. या रेस्क्यू ऑपरेशनदरम्यान तब्बल ५८२ लोकांना सुखरूप बाहेर काढण्यास अग्निशमन दलाला यश आले.
प्रवाशांच्या अतिरिक्त संख्येमुळे मोनोवर ताण?
आज सकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईतील रस्ते आणि लोकल सेवा विस्कळीत झाली असताना, आता मोनोरेललाही मोठा फटका बसला आहे. भक्ती पार्क ते म्हैसूर कॉलनी दरम्यान जाणारी एक मोनोरेल तांत्रिक बिघाडामुळे अचानक थांबली. धक्कादायक बाब म्हणजे, ही मोनोरेल एका बाजूला झुकलेली असून, आतमध्ये शेकडो प्रवासी अडकले होते.
Monorail stuck in Mumbai.
Rescue operation going on.#Mumbai pic.twitter.com/PFXEBsu5lM
— Vivek Gupta (@imvivekgupta) August 19, 2025
या गंभीर परिस्थितीत मुंबई अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली आहे. अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी सीडींच्या मदतीने बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. तसेच, गाडीचा आपत्कालीन दरवाजा तोडून प्रवाशांना बाहेर काढण्याची शक्यता आहे. रेस्क्यू ऑपरेशन सुरू असताना परिसरात दोन्ही बाजूकडील रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत.
प्रवाशांनी त्वरित बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या १९१६ या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधला. माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दलाच्या पथकाने तीन क्रेनसह घटनास्थळी धाव घेतली आणि बचावकार्य सुरू केले.