Tuesday, August 19, 2025

बंद पडलेली मोनोरेल एका बाजूला झुकली; प्रवाशांचा जीव टांगणीला

बंद पडलेली मोनोरेल एका बाजूला झुकली; प्रवाशांचा जीव टांगणीला

मुंबई: मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आधीच लोकल सेवा विस्कळीत झाली असताना, आता मोनोरेलमध्येही तांत्रिक बिघाड झाल्याने प्रवाशांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागला. सायंकाळी ६:१५ वाजण्याच्या सुमारास चेंबूर ते भक्ती पार्क दरम्यान धावणारी मोनोरेल अचानक बंद पडली. तांत्रिक बिघाडामुळे एसी बंद झाल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे आणि गुदमरल्याचे वातावरण निर्माण झाले.





प्रवाशांनी त्वरित बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या १९१६ या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधला. माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दलाच्या पथकाने तीन क्रेनसह घटनास्थळी धाव घेतली आणि बचावकार्य सुरू केले. जवळपास एक तासाहून अधिक काळ अडकून पडलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी बचाव पथकाने मोनोरेलच्या आपत्कालीन दरवाज्यांच्या काचा फोडण्याचा निर्णय घेतला. या मोहिमेसाठी वैद्यकीय पथकही घटनास्थळी दाखल झाले असून, जवळच्या रुग्णालयांनाही सज्ज राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.



मोनोरेल पूर्णपणे बंदिस्त असल्यामुळे आणि एसी बंद पडल्यामुळे आतमध्ये हवा खेळती नव्हती. त्यातच गाडीतील दिवेही बंद झाल्याने प्रवाशांची भीती अधिकच वाढली. गाडीत चालक वगळता कोणताही तंत्रज्ञ नसल्यामुळे परिस्थिती आणखी गंभीर झाली. यामुळे प्रवाशांचा जीव टांगणीला लागला आहे. अशा परिस्थितीत प्रवाशांच्या सुरक्षिततेची जबाबदारी कोणाची, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.



मोनोरेल एका बाजूला झुकली, अग्निशामक दलाकडून रेस्क्यू सुरु


आज सकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईतील रस्ते आणि लोकल सेवा विस्कळीत झाली असताना, आता मोनोरेललाही मोठा फटका बसला आहे. भक्ती पार्क ते म्हैसूर कॉलनी दरम्यान जाणारी एक मोनोरेल तांत्रिक बिघाडामुळे अचानक थांबली. धक्कादायक बाब म्हणजे, ही मोनोरेल एका बाजूला झुकलेली असून, आतमध्ये शेकडो प्रवासी अडकले आहेत.


जवळपास तासाभरापासून ही गाडी जागेवरच थांबली आहे. तांत्रिक बिघाडामुळे गाडीतील वीज पुरवठा आणि एसी पूर्णपणे बंद पडले आहेत. त्यामुळे आतमध्ये असलेल्या प्रवाशांना श्वास घेणेही कठीण झाले आहे, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. घाबरलेले प्रवासी 'आम्हाला बाहेर काढा' अशी ओरड करत आहेत आणि गाडीचे दरवाजे वाजवत आहेत.


या गंभीर परिस्थितीत मुंबई अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली आहे. अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी सीडींच्या मदतीने बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. तसेच, गाडीचा आपत्कालीन दरवाजा तोडून प्रवाशांना बाहेर काढण्याची शक्यता आहे. रेस्क्यू ऑपरेशन सुरू असताना परिसरात दोन्ही बाजूकडील रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत.


मोनोरेल प्रशासनाने या घटनेबद्दल माहिती दिली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, मैसूर कॉलनी स्टेशनजवळ मोनोरेलच्या वीज पुरवठ्यात किरकोळ समस्या आली होती. दुरुस्तीसाठी पथक घटनास्थळी पोहोचले असून, लवकरच सेवा पूर्ववत केली जाईल, असे त्यांनी सांगितले. सध्या वडाळा आणि चेंबूर दरम्यानची सेवा एकाच मार्गावर सुरू आहे. मात्र, तासाभराहून अधिक काळ गाडी अडकून पडल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या घटनेमुळे मोनोरेलच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Comments
Add Comment