दक्षिण महाराष्ट्रातील सांगली, कोल्हापूर आणि सातारा या परंपरेने महाविकास आघाडीच्या बालेकिल्ल्यामध्ये गेल्या वर्षभरात राजकीय समीकरणांचा जबरदस्त उलटफेर झाला आहे. जयंत पाटील, सतेज पाटील आणि पृथ्वीराज चव्हाण हे आघाडीचे नेते एकाकी पडले आहेत. लोकसभा, विधानसभा आणि त्यानंतर पक्षांमध्ये लागलेली गळतीने या आघाडीचे संघटनात्मक बळ खिळखिळे झाले आहे, तर महायुतीने तिन्ही जिल्ह्यांत आपली पकड घट्ट केली आहे. शिवसेना (उबाठा) तर तीन जिल्ह्यांतून हद्दपार व्हायची वेळ आली आहे. अरुण दुधवाडकर, नितीन बानगुडे-पाटील या दोन संपर्कप्रमुख आणि सचिव विनायक राऊत यांच्या हस्तक्षेपामुळे उरलेसुरले शिवसैनिक पक्ष सोडत आहेत. निवड झालेला एकही यांचा जिल्हाध्यक्ष सक्रिय झाला नाही.
लोकसभा २०२४ मध्ये सांगलीत स्वातंत्र्य उमेदवार विशाल पाटील यांनी काँग्रेसच्या पाठबळावर भाजपचे माजी खासदार संजय पाटील यांचा तब्बल एक लाख मतांनी पराभव केला. कोल्हापुरात शाहू छत्रपती महाराज (काँग्रेस) यांनी शिवसेना (शिंदे)चे संजय मंडलिक यांना मोठ्या फरकाने हरवले. मात्र साताऱ्यात भाजपचे उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादी (शरद पवार गट)चे शशिकांत शिंदे यांना चुरशीच्या लढतीत पराभूत करून विजय मिळवला. या निकालांनी सांगली व कोल्हापुरात काँग्रेसला थोडा दिलासा दिला असला, तरी साताऱ्यातील पराभवाने आघाडीच्या गोटात चिंता वाढवली. ही चिंता विधानसभा २०२४ च्या निकालांमध्ये सत्यात उतरली. कोल्हापूर आणि सातारा या दोन्ही जिल्ह्यांत महाविकास आघाडीला एकही जागा मिळाली नाही. कोल्हापुरातील सर्वच मतदारसंघ महायुतीच्या ताब्यात गेले, तर साताऱ्यात भाजप आणि शिंदे-अजित पवार गटाने सर्व जागा जिंकल्या. सांगली जिल्ह्यात काँग्रेसने विश्वजीत कदम आणि राष्ट्रवादी शरद पवार काठावर पास झालेले जयंत पाटील तसेच युवा रोहित आर आर पाटील तर सांगली मिरज, जत आणि शिराळा हे चार मतदारसंघ भाजपने आणि खानापूर हा एक मतदारसंघ शिंदे शिवसेनेने जिंकला आहे. यामुळे सांगली जिल्ह्याचा बहुतांश भाग महायुतीच्या ताब्यात गेला. सांगलीत सुधीर गाडगीळ (भाजप) यांनी पुन्हा विजय मिळवला, शिराळ्यात भाजपचे सत्यजीत देशमुख यांनी राष्ट्रवादी (शरद पवार गट)च्या मानसिंग नाईक यांचा पराभव केला, तर खानापुरात शिवसेना (शिंदे)चे सुहास बबार यांनी राष्ट्रवादीच्या वैभव पाटील यांना हरवले. २०१९च्या तुलनेत ही मविआसाठी स्पष्ट पिछेहाट होती.
या राजकीय घसरणीला गेल्या दोन-तीन महिन्यांत झालेल्या मोठ्या गळतीने आणखी गती दिली. सांगलीत काँग्रेसच्या वसंत दादा पाटील यांच्या सुनबाई जयश्री मदन पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार आणि शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनीही दोनच दिवसांपूर्वी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ज्या डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांच्यासाठी लोकसभेला काँग्रेसशी पंगा घेतला त्या संजय राऊत यांना तोंडावर पाडत पैलवान चंद्रहार एकनाथ शिंदे यांच्या पक्षात सामील झाले. संजय राऊत यांच्यासाठी पश्चिम महाराष्ट्रात मिळालेली ही सगळ्यात मोठी धोबीपछाड ठरली आहे. अधांतरी आणि बेभरोशी राजकारण करण्याच्या नादात कोल्हापूर, सातारा आणि सांगली जिल्ह्यात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने अस्तित्व गमावले आहे. कोल्हापुरात राष्ट्रवादी (शरद पवार गट)मधील जुने कार्यकर्ते, जिल्हा परिषद सदस्य आणि साखर कारखान्यांशी निगडित नेते आजित पवार गटात सामील झाले. साताऱ्यात शिवसेना (उद्धव गट)मधील काही सदस्य आणि काँग्रेसचे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भाजपमध्ये गेले. या गळतीमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील मविआचे संख्याबळ मोठ्या प्रमाणात कमी झाले. ज्येष्ठ नेते अण्णा डांगे यांनीही शरद पवारांची साथ सोडत भाजपमध्ये पुनर्प्रवेश केला आहे.
लोकसभा आणि विधानसभा पराभवानंतर आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झालेली नाराजी, नेतृत्वावरचा अविश्वास आणि सत्ता नसल्यामुळे विकासकामांसाठी निधी मिळण्यात येणाऱ्या अडचणी या सर्व घटकांमुळे महाविकास आघाडीतून बाहेर पडणाऱ्यांची संख्या वाढली. महायुतीकडून सत्तेतील सहभाग, निधीचे आश्वासन आणि स्थानिक विकासकामांना गती देण्याची हमी यामुळे या गळतीला वेग आला. सांगली, कोल्हापूर आणि सातारा या तिन्ही जिल्ह्यांमध्ये २०१९ पूर्वी मविआ घटक पक्षांचा प्रभाव प्रचंड होता. सांगलीत काँग्रेस-राष्ट्रवादीचे ग्रामीण भागातील वर्चस्व, कोल्हापुरात राष्ट्रवादी व काँग्रेसची जोडी, तर साताऱ्यात शरद पवार गटाची घनघोर पकड होती. मात्र आता परिस्थिती पालटली आहे. काँग्रेसच्या माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनाही कराडच्या जनतेने घरी बसवले आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत महायुतीने ग्रामीण भागापासून शहरी भागापर्यंत सातत्याने विजय मिळवले आणि आता स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांपूर्वी त्यांचे संख्याबळ सर्वाधिक आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या पार्श्वभूमीवर अत्यंत महत्त्वाच्या ठरणार आहेत. सांगली महापालिकेत भाजप-राष्ट्रवादी आणि शिंदे गट बहुमताच्या जवळ आहे, कोल्हापूर जिल्हा परिषदेत महायुतीचा स्पष्ट वरचष्मा आहे, तर साताऱ्यात नगर परिषदांपासून पंचायत समित्यांपर्यंत महायुतीचे वर्चस्व दिसत आहे. मविआकडे आता संघटनात्मक पुनर्बांधणी करण्याशिवाय पर्याय नाही. उमेदवारांची कमतरता, गळतीचा प्रवाह थांबवणे आणि पराभवांमुळे खचलेल्या कार्यकर्त्यांना प्रेरित करणे ही त्यांच्यासमोरील सर्वात मोठी आव्हाने आहेत. दक्षिण महाराष्ट्रात गेल्या वर्षभरात घडलेल्या या राजकीय उलथापालथीचा सारांश एकच–महाविकास आघाडीला पूर्वीच्या बालेकिल्ल्यांत घरघर लागली आहे आणि महायुतीने केवळ सत्ता नव्हे, तर संघटनात्मक शक्तीही हातात घेतली आहे. लोकसभा, विधानसभा आणि आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या लढतीतही ‘अस्तित्वाची लढाई’ ठरणार आहे. उदयनराजेंकडून थोडक्यात पराभूत झालेले शशिकांत शिंदे यांना शरद पवार यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष केले पण जयंत पाटील नाराज झाले आहेत. गेल्या आठवड्यात सुरू झालेल्या पवारांच्या समता यात्रेत ते सहभागी नाहीत. जयंत पाटील यांना सांगलीच्या राजकारणातच जखडून ठेवण्याची महायुतीने रणनीती आखली आहे. सांगली जयंत पाटलांसमोर महापालिका आणि जिल्हा परिषदेचे मोठे आव्हान आहे. त्यामुळे दक्षिण महाराष्ट्राचा ढासळता गड पाहून शरद पवार इथे चारच दिवसांत आपली यात्रा घेऊन दक्षिण महाराष्ट्रात येणार आहे. मात्र त्यांना पूर्वीच प्रतिसाद मिळेल का, याबद्दल शंका व्यक्त केली जात आहे.