Tuesday, August 19, 2025

Eknath Shinde : उपमुख्यमंत्री शिंदेंनी घेतला पावसाचा आढावा; "२४ तासांत ३०० मिमी पाऊस, मिठी नदीला पूर, अन् शेकडो..."

Eknath Shinde : उपमुख्यमंत्री शिंदेंनी घेतला पावसाचा आढावा;

मुंबई : राज्यभरात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पावसाने कहर केला असून, अनेक ठिकाणी ढगफुटीसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. नदी-नाल्यांना आलेल्या पूरांमुळे विदर्भातील काही गावांचा संपर्क तुटला असून, स्थानिक प्रशासन सतत बचावकार्य सुरू ठेवत आहे. दरम्यान, हवामान विभागाने मंगळवार (१९ ऑगस्ट) रोजीही अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्याचबरोबर, मुंबईत रात्रभर चाललेल्या पावसामुळे शहरातील परिस्थिती गंभीर झाली असून, लोकांच्या दैनंदिन जीवनावर त्याचा परिणाम जाणवू लागला आहे. विशेष म्हणजे, मुंबईकरांची लाईफलाइन म्हणून ओळखली जाणारी उपनगरी रेल्वे सेवा सतत पडणाऱ्या पावसामुळे खोळंबली आहे. त्यामुळे प्रवाशांना मोठ्या प्रमाणावर गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.



ठाणे–सीएसएमटी लोकल ठप्प; हार्बर मार्गावरील वाहतूकही थांबली


मुसळधार पावसामुळे मुंबईत रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. मध्य रेल्वेची ठाणे ते सीएसएमटी दरम्यानची लोकल सेवा पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. चुनाभट्टी स्टेशन परिसरात मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याने हार्बर मार्गावरील सीएसएमटी दरम्यानची सेवा देखील पुढील सूचना मिळेपर्यंत स्थगित करण्यात आली आहे. रेल्वे ट्रॅकवर पाणी शिरल्याने प्रवास धोकादायक ठरू शकतो, त्यामुळेच हा निर्णय घेण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून नागरिकांना सूचित करण्यात आलं आहे की, गरज असेल तरच बाहेर पडा; अन्यथा सुरक्षित स्थळीच थांबा. दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या गंभीर परिस्थितीचा आढावा घेतला असून संबंधित विभागांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.



उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले...


अनेक सखल भागांमध्ये पाणी साचले असून, नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परिस्थितीचा आढावा घेतला आणि महत्त्वाची माहिती दिली. उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, “मुंबईत केवळ सहा तासांत २०० मिमी, तर २४ तासांत तब्बल ३०० मिमी पाऊस झाला आहे. एवढ्या कमी वेळात झालेल्या अतिवृष्टीमुळे मिठी नदीला पूर आला असून परिस्थिती गंभीर बनली आहे. महापालिकेचे कर्मचारी व अधिकारी सातत्याने फिल्डवर काम करत आहेत. या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी ५२५ पंप सुरू करण्यात आले असून, १० मिनी पंपिंग स्टेशनही कार्यरत आहेत. होल्डिंग पाँड ओव्हरफ्लो झाल्याने पाणी उपसण्याचे आव्हान वाढले आहे.” त्यांनी पुढे सांगितले की, “मिठी नदीला आलेल्या पुराच्या धोक्यामुळे ३०० नागरिकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आले आहे. मुंबईत जीवितहानी होऊ नये व मालमत्तेचे नुकसान टाळले जावे, यासाठी प्रशासनातील सर्व यंत्रणा युद्धपातळीवर काम करत आहेत. सहा प्रमुख पंपिंग स्टेशन पूर्ण क्षमतेने कार्यरत आहेत. अल्पावधीत अतिवृष्टी झाल्यामुळे ही स्थिती उद्भवली असून, नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे.”





मुसळधार पावसाने मुंबई ठप्प; लोकलसेवा कोलमडली, प्रवाशांचे हाल


सलग मुसळधार पावसामुळे मुंबईकरांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. मंगळवारी सकाळपासूनच तिन्ही मार्गांवरील लोकल रेल्वे सेवा विस्कळीत झाली. सकाळी रेंगाळत धावणाऱ्या गाड्या दुपारी अकरा वाजल्यानंतर पूर्णपणे ठप्प झाल्या. रुळांवर पाणी साचल्याने हार्बर मार्गावरील सेवा बंद करण्यात आली, तर मध्य रेल्वेवरील कुर्ला-सीएसएमटी लोकल बंद झाल्या. लोकल थांबल्याने प्रवाशांना प्रचंड हाल सहन करावे लागत आहेत. अनेकांना पायी चालत जवळच्या स्थानकांपर्यंत पोहोचावे लागले. पावसाचा जोर आणि त्यात करावी लागलेली पायपीट यामुळे नागरिक अक्षरशः हैराण झाले आहेत. दरम्यान, रविवार रात्रीपासून कोसळणाऱ्या पावसाचा परिणाम मंगळवारी सकाळपासून रेल्वे वाहतुकीवर दिसून आला. मध्य आणि हार्बर मार्गावरील अनेक स्थानकांत पाणी साचल्याने गाड्या अर्धा तास उशिराने धावत होत्या. शीव आणि घाटकोपरदरम्यान लोकल थांबून राहिल्याने प्रवाशांना सकाळच्या गर्दीच्या वेळी प्रचंड त्रास सहन करावा लागला. नंतरही पश्चिम, मध्य आणि हार्बर मार्गावरील लोकल वेळापत्रक विस्कळीतच राहिले. रुळ पाण्याखाली गेल्याने आणि स्थानक परिसर पाण्याने व्यापल्याने रेल्वे वाहतुकीचा वेग मंदावला आहे. प्रशासनाने परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे, मात्र पावसाचा जोर कायम असल्याने नागरिकांना अद्यापही दिलासा मिळालेला नाही.

Comments
Add Comment