
मुंबई : महाराष्ट्रभर पावसानं अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची तीव्रता वाढली असून, विशेषतः मुंबई आणि उपनगरांमध्ये सतत सुरू असलेल्या अतिमुसळधार पावसामुळे चाकरमान्यांची मोठी तारांबळ उडाली आहे. कोकण आणि मराठवाडा विभागातही पावसाने जोरदार हजेरी लावली असून, त्याचा सर्वाधिक फटका शेतीला बसला आहे. काही ठिकाणी तर ढगफुटीसदृश्य पावसाची नोंद झाली असून, शेतं नदीसारखी वाहताना दिसत आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. दरम्यान, हवामान विभागाने पुढील ३ दिवसांसाठी राज्यभर अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. याच पार्श्वभूमीवर प्रशासनाने नागरिकांना अनावश्यक प्रवास टाळण्याचं, तसेच सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे. शेतकऱ्यांनी देखील शेतीसंबंधित आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असा सल्ला देण्यात आला आहे.

मुंबई : मुंबई महानगरपालिकेकडून एक महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर करण्यात आला आहे. शहरातील वाढत्या परिस्थितीचा विचार करून महापालिकेने आपल्या ...
राज्यात तिहेरी संकट – मुसळधार पाऊस, वादळ आणि विजांचा इशारा
दरम्यान, महाराष्ट्रात पावसाचं संकट अजूनही कायम असून, हवामान विभागानं मंगळवारीदेखील मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. विशेषतः मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर आणि रायगड या जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. याशिवाय कोकण, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील घाटमाथा भागांनाही जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार उद्या कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये वाऱ्याचा वेग प्रति तास ५० ते ६० किमीपर्यंत राहू शकतो. यासोबतच विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता असल्याने जोरदार पाऊस, वादळ आणि विजा असं तिहेरी संकट राज्यावर ओढवल्याचं चित्र दिसत आहे.
उपमुख्यमंत्री शिंदेंचं आवाहन- सतर्क राहा, अनावश्यक घराबाहेर पडू नका
राज्यात मुसळधार पावसाचा जोर कायम असताना, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नागरिकांना सतर्कतेचं आवाहन केलं आहे. मुंबई शहर, उपनगर, ठाणे, पालघर आणि संपूर्ण मुंबई महानगर क्षेत्रात गेल्या दोन दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. आज पावसाची तीव्रता अधिक वाढल्याने शिंदे यांनी स्वतः परिस्थितीचा आढावा घेतला. यासंदर्भात त्यांनी ठाणे जिल्ह्याधिकाऱ्यांशी चर्चा करून प्रशासनाला सतत सतर्क राहण्याचे आणि आवश्यक ती उपाययोजना तत्काळ करण्याचे निर्देश दिले आहेत. हवामान खात्याने मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केला असून, पुढील ४८ तासांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री शिंदे यांनी नागरिकांना काळजी घेण्याचं आणि गरज असल्यासच घराबाहेर पडण्याचं स्पष्ट आवाहन केलं आहे.
मंत्री नितेश राणेंचं मच्छिमारांना आवाहन- खोल समुद्रात जाऊ नका
मच्छीमार बांधवांना व नागरिकांना सतर्कतेचे आवाहन..!
कोकण किनारपट्टीवर सोमवार दि.१८ ऑगस्ट ते शुक्रवार दि.२२ ऑगस्ट दरम्यान वादळी वाऱ्यासह अतिवृष्टीची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवली आहे. या कालावधीत समुद्रातील वाऱ्याचा वेग ४५ ते ५० कि.मी. प्रती ताशी राहणार असून तो ६५ कि.मी.… pic.twitter.com/SoFBITtkUj
— Nitesh Rane (@NiteshNRane) August 18, 2025
दरम्यान, मंत्री नितेश राणे यांनी मच्छिमारांना विशेष सतर्कतेचं आवाहन केलं आहे. हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार १८ ते २२ ऑगस्टदरम्यान अतिवृष्टी होणार असून, त्यासोबत समुद्रात वादळं आणि जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. समुद्रात वाऱ्याचा वेग ताशी ६० किमीपर्यंत पोहोचू शकतो, त्यामुळे मच्छिमारांनी या कालावधीत खोल समुद्रात जाणं टाळावं, असं राणे यांनी स्पष्ट केलं आहे. त्यांनी मच्छिमारांना सतर्क राहण्याचं, खबरदारी घेण्याचं आणि जीवितहानी टाळण्यासाठी समुद्रापासून दूर राहण्याचं आवाहन केलं आहे.