
मुंबई : मुंबईसह उपनगरांमध्ये दोन दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू असून अनेक भागांमध्ये नागरिकांच्या कमरेइतकं पाणी भरल्याने चालताना मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आहेत. पावसामुळे मुंबईची लाईफलाईन असलेली लोकल सेवा देखील टप्प झाली आहे. सायन, कुर्ला आणि दादर दरम्यान रेल्वे ट्रॅकवर पाणी साचल्यामुळे या भागात लोकल सेवेत खोळंबा दिसून येतो आहे.
मध्य रेल्वे प्रशासनाच्या माहितीनुसार, प्रचंड पाऊस आणि भरती सुरू असल्यामुळे महानगरपालिकेने फ्लड गेट्स उघडले होते, ज्यामुळे समुद्राचे पाणी मुंबईत शिरण्यापासून रोखले जात आहे. सध्या हे फ्लड गेट बंद करण्यात आले आहेत. कुर्ला, सायन, चुनाभट्टी, टिळक नगर यासह मिठी नदीच्या जवळ असलेल्या परिसरांमध्ये पाणी साचले आहे. दादरसारख्या स्टेशनमध्येही पाणी भरल्याने लोकल सेवेला प्रत्यक्ष फटका बसला आहे.
सध्या सायन आणि दादर दरम्यान अनेक लोकल उभ्या आहेत, पण पाण्याची पातळी ओसरल्यावरच वाहतूक पुन्हा सुरू होईल असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. तसेच, रेल्वे ट्रॅकवर पाणी सुरू असल्यामुळे मध्य रेल्वेच्या काही ठिकाणी वाहतूक खोळंबलेली आहे आणि प्रवाशांना अद्याप मोठा त्रास सहन करावा लागत आहे.