
मिठी नदी, पोयसर नदी, दहिसर नदीने धोक्याची पातळी गाठली
मुंबई: मुंबई आणि महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यांत सातत्याने सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुंबई, ठाणे, पालघर आणि नवी मुंबईतील अनेक भागांमध्ये रस्त्यांवर पाणी साचल्यामुळे परिस्थिती अत्यंत गंभीर झाली आहे.
मिठी नदी, पोयसर नदी, दहिसर नदीने धोक्याची पातळी गाठली आहे. मुंबईतील सर्वच नाले तुंडूंब भरुन वाहताहेत. सखल भागात पाणी साचल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. कांदिवली, मालाड, दहिसर, विलेपारले, अंधेरी परिसरात अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. कांदिवली- मालाडमधील डोंगराळ भागातील क्रांतीनगरमधील झोपडीधारकांना प्रशासनाने सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी लाऊडस्पिकरवरुन घोषणा देण्यात येत आहेत. त्यांच्या खाण्यापिण्याची आणि निवासाची शाळेमध्ये व्यवस्था करण्यात आली आहे. परंतू अनेक रहिवाशी घर सोडायला तयार नसल्याने आपत्ती व्यवस्थापन कर्मचारी तेथे तैनात केले आहेत.
मुंबईतील अंधेरी आणि बोरिवली भागांत फक्त तीन तासांत ५० मिमीपेक्षा जास्त पाऊस पडला. बोरिवली ते चर्चगेट या भागांमध्ये पुढील काही तासांत पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हवामान विभागाने मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांसाठी १८–१९ ऑगस्टसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. यामुळे या भागांतील शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
नांदेड जिल्ह्यात २०० हून अधिक लोक अडकले होते, ज्यांना बाहेर काढण्यासाठी सेनेची मदत घेण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुष्टी केली आहे की आतापर्यंत ७ जणांचा मृत्यू झाला आहे.
कल्याणमधील जय भवानी नगर भागात नेतिवली टेकाडावर भूस्खलन झाले असून, स्थानिक रहिवाशांना जवळच्या महानगरपालिकेच्या शाळेत हलवण्यात आले आहे. त्यांच्या जेवणाची व राहण्याचीही व्यवस्था करण्यात आली आहे.
जिल्हा प्रशासनाने येथे सेना व एनडीआरएफच्या टीम्स तैनात केल्या आहेत. फडणवीस यांनी मंत्रालयातील आपत्कालीन नियंत्रण केंद्रातून परिस्थितीचा आढावा घेतला आणि सांगितले की रत्नागिरी, रायगड आणि हिंगोली जिल्ह्यांमध्येही जोरदार पाऊस झाला आहे.
विदर्भ भागात सुमारे २ लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले असून ८०० गावांवर परिणाम झाला आहे.
मुंबईत ८ तासांत १७० मिमी पावसाची नोंद झाली, त्यामुळे १४ ठिकाणी पाणी साचले. मुख्यमंत्र्यांनी सांगितले की पुढील १०–१२ तास अत्यंत महत्त्वाचे आहेत आणि स्थानिक स्वराज्य संस्थांना सुट्टी जाहीर करण्याचा अधिकार देण्यात आला आहे. मराठवाडा विभागात गेल्या पाच दिवसांत ६ जणांचा मृत्यू झाला असून २०५ जनावरांचे नुकसान झाले आहे.