नवी दिल्ली: उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी उमेदवार निश्चित करण्याकरिता'इंडिया' आघाडीच्या वतीने तामिळनाडूतील द्रमुक पक्षाचे राज्यसभा खासदार तिरुची सिवा यांचे नाव आघाडीवर आहे. जर त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले, तर उपराष्ट्रपती पदाची निवडणूक बिनविरोध करण्याचा भाजपचा प्रयत्न असफल ठरू शकतो.
भाजपने पुढील वर्षी होणाऱ्या तामिळनाडू विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सीपी राधाकृष्णन यांना उमेदवारी जाहीर केली आहे. यामुळे द्रमुक, अण्णाद्रमुक आणि काँग्रेससमोर धर्मसंकट निर्माण झाले होते. जर द्रमुकने राधाकृष्णन यांना पाठिंबा दिला नसता, तर त्यांच्यावर टीकेची झोड उठू शकली असती. मात्र, आता 'इंडिया' आघाडीकडून तामिळनाडूतीलच उमेदवार देण्याचा विचार सुरू असल्यामुळे या वादाची तीव्रता कमी होण्याची शक्यता आहे.
नवी दिल्ली: भारतीय जनता पक्षाच्या संसदीय मंडळाची आज नवी दिल्ली येथे महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी एनडीएच्या ...
द्रमुक पक्षाने तामिळ अस्मितेचा मुद्दा पुढे करत, राधाकृष्णन यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर तामिळनाडूतीलच एखाद्या नेत्याला उमेदवारी दिली जावी, अशी भूमिका घेतली आहे. या भूमिकेला काँग्रेसनेही सहमती दर्शवल्याचे वृत्त आहे. तिरुची सिवा यांना उमेदवारी देऊन 'इंडिया' आघाडीकडे जरी विजयासाठी पुरेसे संख्याबळ नसले, तरी तामिळ अस्मितेच्या नावावर मतदारांपर्यंत एक महत्त्वाचा संदेश पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असेल.
दुसरीकडे, सत्ताधारी भाजपने उपराष्ट्रपती पदाची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी विरोधी पक्षांशी संपर्क साधण्यास सुरुवात केली असून, पाठिंब्यासाठी आवाहन केले आहे.