Sunday, August 17, 2025

परिणामहीन चर्चा

परिणामहीन चर्चा

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्यात नुकतीच चर्चा झाली. मात्र काहीही ठोस परिणाम न निघताच संपलीही, पण यातून एक भारतासाठी चिंता वाढली आहे. कारण या चर्चेतून भारतावरील टॅरिफचे संकट अधिक गहिरे झाले आहे. 'भारत आमचा मित्र असला तरी...' असं म्हणत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला मोठा धक्का दिला आहे. अमेरिकेने भारतावर २५ टक्के आयात शुल्क लागू केले आहे. दोन्ही देशातील व्यापार कराराच्या वाटाघाटी काही मुद्द्यांवर अडकल्याने ट्रम्प यांनी ही घोषणा केलीे. इतकेच नाही तर रशियाकडून लष्करी साहित्य आणि तेलाची खरेदी यामुळे भारतावर दंडही लावला जाईल अशी भूमिका घेतलीे. भारत हा रशियाचा खरेदीदार देश आहे हे योग्य नसून भारताला २५ टक्के आयात शुल्क आणि वर तेवढाच दंडही आकारला जाईल, अशी घोषणा ट्रम्प यांनी केली. अमेरिकेच्या या निर्णयामुळे भारतातून अमेरिकेत निर्यात होणाऱ्या वस्तूवरील कर वाढणार आहेत. जर भारतातून अमेरिका १०० रुपयांची एखादी वस्तू आयात करत असेल, तर यापुढे त्यावर २५ टक्के आयात शुल्क लावले जाईल. याचा अर्थ अमेरिकन ग्राहकांना ती वस्तू १२५ रुपयांना घ्यावी लागेल. त्यामुळे अमेरिकेत भारतीय वस्तूंच्या किंमती वाढतील आणि त्याचा फटका भारतीय उद्योगांना बसेल.


अलास्का येथील एका ठिकाणी दोन्ही जागतिक महासत्तांमध्ये चर्चा झाली आणि ती निष्फळ ठरली ही भारतासाठी दिलासादायक बाब आहे असे काहींनी म्हटले तर काहींनी भारतासाठी आता टॅरिफचा धोका खूप वाढला आहे असे म्हटले. अमेरिकन अर्थमंत्री स्कॉट बेसेट यांनी म्हटले आहे, की जर ही शिखर परिषद परिणामहीन राहिली, तर भारतावर अमेरिकेचे टॅरिफ आणखी वाढू शकेल. अजून याबाबत अंतिम निर्णय झाला नाही. पण तशीही शक्यता आहे. या शिखर परिषदेनंतर दोन्ही नेत्यांनी आमची चर्चा चांगली झाली असे म्हटले असले तरीही त्याच्यातून परिणाम काहीही न निघाल्याने भारताच्या तेलपुरवठ्याबाबत निश्चितच संकटाचे ढग दाटले आहे. कारण अमेरिकेने रशियावर निर्बंध लादले, तर भारताला रशियाकडून तेल खरेदी करणे बंद करावे लागले. त्या परिस्थितीत भारताकडे पर्याय आहेत याचा विचार केला असता मध्य पूर्वेतून तेल आयात करणे हा एक पर्याय आहे. पण तो जास्त महाग आहे. खुद्द अमेरिकेकडून तेल खरेदी करणे हा एक पर्याय आहे पण तो तितका लाभप्रद नाही. आफ्रिकेकडून भारत तेल खरेदी करू शकतो पण तोदेखील पर्याय भारतासाठी महाग आहे. रशियाकडून भारत स्वस्तात तेल आयात करत होता आणि त्यामुळे भारतातील अर्थव्यवस्थेला चांगला आधार मिळाला होता. पण याचा लाभ सामान्य माणसांपर्यंत पोहोचला नव्हता. तेलाचे दर प्रचंड चढलेले होते. त्यामुळे भारताने जर रशियाकडून तेल खरेदी करणे अमेरिकेच्या दबावाखाली येऊन बंद केले, तर भारतात पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढवावे लागतील. एकूणच ही स्थिती भारतासाठी चिंताजनक आहे. भारत रशियाकडून तेल खरेदी करत आहे आणि युक्रेन यांच्या लोकांना ठार मारण्यास सहाय्य करत आहे असा ट्रम्प यांच्या युक्तीवादामागे अर्थ आहे. अर्थात भारताने ट्रम्प यांचा इशारा दुर्लक्ष करण्यासारखे आहे. पुतीन यांच्यावर पाश्चात्य देशांनी प्रतिबंध लावले आहेत आणि जागतिक न्यायालयाने त्यांना अटक करण्याचे वॉरंट बजावले आहे. पण अमेरिकेच्या टॅरिफच्या धोक्यातच भारतासाठी एक अत्यंत महत्त्वाचा संदेश आहे तो म्हणजे चीनला ट्रम्प धमकावू शकत नाही. म्हणून त्यांचा डाव आहे, की भारताला रशियापासून अलग करणे. रशिया भारतासोबत मैत्रीला सातत्याने जागत आला आहे. अगदी अमेरिकेने भारतीय समुद्रात सारे आरमार आणून ठेवले होते तेव्हाही रशियानेच त्यांच्या फ्लीटच्या युद्धनौका अरबी समुद्रात आणल्या होत्या आणि त्यामुळे अमेरिकेचे आरमार जसे आले तसे गूपचूप गेले. त्यामुळे ट्रम्प यांनी कितीही प्रयत्न केले तरीही भारत हा रशियाच्या मैत्रीला जागणारा देश आहे.


भारताने ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील भेटीचे स्वागत केले आहे, पण त्यामुळे ट्रम्प भारतावर टॅरिफ लादणार की नाही याबाबत अद्याप संदिग्धता कायम आहे. कारण अजूनही ट्रम्प यांनी भारताकडून आयात केल्या जाणाऱ्या मालावर सरसकट २५ टक्के आयात कर लावण्याची घोषणा केली आहे. आणखी ती २५ टक्के वाढवण्याचा प्रस्ताव होता. जर अमेरिकेने तसा निर्णय घेतलाच, तर भारतासाठी ही चांगली बातमी नसेल. कारण मग भारतावर एकूण टॅरिफ ५० टक्के होईल आणि भारताची अर्थव्यवस्था आज चांगल्या अवस्थेत आहे ती गटांगळ्या खाईल. अमेरिकन अर्थमंत्र्यांनी ट्रम्प सेकंडरी टॅरिफ म्हणजे दुय्यम कर लागू करू शकतात असे म्हटले होते पण भारताने या म्हणण्याला किरकोळ म्हणून निकालात काढले होते. पण या समीटचे परिणाम भारतावर जास्त होणार आहेत, कारण प्रश्न तेलाचा आहे. भारत तेलाच्या बाबतीत अजूनही दुर्दैवाने स्वयंपूर्ण नाही आणि त्यामुळे त्याला इतरांवर तेलासाठी अवलंबून राहावे लागते. ट्रम्प यांची भारतावरील नाराजी यासाठी आहे कारण ते रशियाकडून तेल खरेदी करून रशियाच्या अर्थव्यवस्थेला आधार देत आहे. पण कोणताही देश आपला फायदा आधी पाहणार हे ट्रम्प यांना लक्षात यायला हवे. ट्रम्प यांच्या टॅरिफ युद्धात भारतासारखा विकसनशील देश भरडला जात आहे. भारतावर ट्रम्प यांचा आरोप आहे की भारत रशियाकडून तेल खरेदी करून त्या देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना देत आहे. पण रशिया आणि अमेरिका या जागतिक ताकदवान देश राहिलेल्या देशांच्या युद्धात भारतासारखा देश भरडला जात आहे हे वास्तव आहे. ट्रम्प यानी भारतावर टॅरिफ लादल्याने भारतापुढे अवघड पर्याय आहे. भारताकडे आता फारसे पर्याय नाही, एक तर प्रत्युत्त्तर देणे आणि रशियन तेल आयात थांबली तर काही दिलासा देणे हे ते पर्याय आहेत. एकूणच ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील चर्चेचे फलित काहीच निघाले नसले तरीही भारतासाठी ही बातमी चिंता वाढवणारी आहे.

Comments
Add Comment