Monday, August 18, 2025

रघुजी भोसलेंची ऐतिहासिक तलवार आज मुंबईत येणार, मुख्यमंत्री लोकार्पण करणार

रघुजी भोसलेंची ऐतिहासिक तलवार आज मुंबईत येणार, मुख्यमंत्री लोकार्पण करणार
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे महाराष्ट्रात दाखल झाल्यानंतर आता मराठा सैन्यातील अग्रणी सरदार रघुजी भोसले यांची तलवार लंडनहून आज, सोमवारी मुंबईत दाखल होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या ऐतिहासिक तलवारी लोकार्पण होणार आहे. नागपूरकरच्या भोसले घराण्याचे संस्थापक आणि छत्रपती शाहू महाराजांच्या काळातील मराठा सैन्यातील महत्त्वाचे सरदार रघुजी भोसले यांची ही तलवार राज्य सरकारने नुकतीच लिलावात मिळवली होती. सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशीष शेलार आज सकाळी १० वाजता ती विमानतळ प्राधिकरणाकडून ताब्यात घेतील. त्यानंतर विमानतळावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून बाइक रॅलीसह चित्ररथावर विराजमान करून ही तलवार पु. ल. देशपांडे कला अकादमीमध्ये आणण्यात येईल.

सांस्कृतिक कार्य विभाग, पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालये संचालनालय सांस्कृतिक कार्य संचालनालय, पु.ल. देशपांडे कला अकादमीतर्फे संध्याकाळी ६ वाजता ‘सेना साहेब सुभा पराक्रम दर्शन’ सोहळा आयोजित करण्यात आला आहे. यात भोसले यांच्या ऐतिहासिक तलवार प्रदर्शनाचे उद्घाटन व लोकार्पण मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते होईल. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्यासह भोसले यांचे वंशज मुधोजीराजे भोसले याप्रसंगी उपस्थित राहणार आहेत. सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी, यांच्यासह स्थानिक खासदार अनिल देसाई, स्थानिक आमदार महेश सावंत यांनाही या कार्यक्रमाला आमंत्रित करण्यात आले आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असणार आहे.

सरदार भोसले यांच्या तलवारीसोबत १२ वारसा मानांकित गडकिल्ल्यांच्या माहितीचे प्रदर्शन १९ ते २५ ऑगस्टदरम्यान सकाळी ११ ते सायं ७ या वेळेत पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या कला दालनात सुरू राहणार आहे. ते सर्वांसाठी विनामूल्य असणार आहे.

Comments
Add Comment