
नवी दिल्ली: एनडीएचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार आणि महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन आज दिल्लीत पोहोचले आहेत. विमानतळावर त्यांचे स्वागत करण्यासाठी दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता आणि अनेक वरिष्ठ भाजप नेते उपस्थित होते. महाराष्ट्राच्या राज्यपालांचे यावेळी दिल्लीत जोरदार स्वागत करण्यात आले. दिल्लीत पोहोचल्यानंतर राधाकृष्णन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
पंतप्रधान मोदींना भेटल्यानंतर सी.पी. राधाकृष्णन यांनी सोशल मीडियावर त्यासंबंधीत माहिती आणि फोटो देखील पोस्ट केला आहे. या पोस्टमध्ये म्हटले आहे की, 'आज मला आमचे प्रिय जननेते, आमचे सर्वात आदरणीय माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नवी दिल्लीत भेटून अभिमान वाटत आहे.'
Blessed and honoured to meet our beloved People’s leader our most respected Honourable Prime Minister Shri. @narendramodi Ji today in New Delhi. 🙏🙏 pic.twitter.com/eC1YpCUVKg
— CP Radhakrishnan (@CPRGuv) August 18, 2025
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी सीपी राधाकृष्णन यांना उमेदवारी
भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएने रविवारी उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी सीपी राधाकृष्णन यांना उमेदवार म्हणून घोषित केले. भाजप संसदीय मंडळाच्या बैठकीनंतर ही घोषणा करण्यात आली, ज्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह पक्षाचे वरिष्ठ नेते उपस्थित होते.
सीपी राधाकृष्णन कोण आहेत?
चंद्रपुरम पोन्नुस्वामी (सीपी) राधाकृष्णन यांनी ३१ जुलै २०२४ रोजी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून शपथ घेतली. यापूर्वी ते दीड वर्षे झारखंडचे राज्यपाल होते. झारखंडमधील त्यांच्या कार्यकाळात राष्ट्रपतींनी त्यांना तेलंगणाचे राज्यपाल आणि पुद्दुचेरीचे उपराज्यपाल अशी अतिरिक्त जबाबदारीही सोपवली. सीपी राधाकृष्णन यांना तामिळनाडूच्या राजकारणात आणि सार्वजनिक जीवनात चार दशकांहून अधिक अनुभव आहे. त्यांचा जन्म २० ऑक्टोबर १९५७ रोजी तामिळनाडूच्या तिरुप्पूर जिल्ह्यात झाला.
जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यानंतर उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक होत आहे. प्रकृतीच्या कारणास्तव त्यांनी २१ जुलै रोजी राजीनामा देण्याची घोषणा केली होती. ७४ वर्षीय धनखड ऑगस्ट २०२२ मध्ये उपराष्ट्रपती झाले, परंतु दोन वर्षांनीच त्यांनी या पदाचा राजीनामा दिला.