
मुंबई : अमिताभ बच्चन यांचा लोकप्रिय रिअॅलिटी शो कौन बनेगा करोड़पती पुन्हा एकदा सीझन १७ सोबत प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या शोचा नवीन सीझन ११ ऑगस्टपासून सुरू झाला असून पहिल्याच आठवड्यात शोला पहिला करोडपती मिळाला आहे. याचा प्रोमो चॅनलने आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केला आहे. केबीसी १७ चे पहिले करोडपती उत्तराखंडचे आदित्य कुमार आहेत.
आदित्य कुमार हे या सीझनचे पहिले करोडपती ठरले आहेत. विशेष म्हणजे ते ७ कोटींच्या जॅकपॉट प्रश्नासाठीही प्रयत्न करणार आहेत. मात्र ते ७ कोटी जिंकतात का नाही, हे पाहण्यासाठी एपिसोड प्रसारित होईपर्यंत थोडं वाट पाहावं लागेल. प्रोमो पाहिल्यानंतर प्रेक्षकांमध्ये या क्षणाबाबत प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.
प्रोमोमध्ये आदित्य अमिताभ बच्चन यांच्याशी संवाद साधताना दिसतात. ते आपल्या कॉलेजच्या आठवणी शेअर करतात. त्यांनी सांगितले की एकदा कॉलेजच्या काळात त्यांनी आपल्या सगळ्या मित्रांना सांगितले होते की ते केबीसी साठी सिलेक्ट झाले आहेत आणि त्यांनी संपूर्ण आठवडा हा प्रँक केला.
आदित्य म्हणतात, “कॉलेजच्या दिवसांत मी माझ्या सगळ्या मित्रांना सांगितलं की मी केबीसी साठी सिलेक्ट झालोय आणि लवकरच केबीसी टीम शूटसाठी येणार आहे. त्यामुळे सगळे सज्ज झाले. कुणी नवी पँट शिवून घेतली, कुणी नवी शर्ट. आठवड्यानंतर जेव्हा त्यांनी विचारलं की कुणी आलं नाही का, तेव्हा मी सांगितलं की मी मजाक करत होतो.”
यानंतर आदित्य म्हणतात की यावेळी जेव्हा खरंच केबीसी चा कॉल आला, तेव्हा कोणीही विश्वास ठेवला नाही. जेव्हा त्यांना मेसेज दाखवला, तेव्हाच लोकांनी विश्वास ठेवला.
हे ऐकून अमिताभ बच्चन म्हणतात, “पोहोचलेच नाही, खूपच वर पोहोचलात आपण.” पुढे आदित्य अमिताभ बच्चन यांना म्हणतात, “सर, विश्वास बसत नाही.” यावर बिग बी उत्तर देतात, “आपण वरपर्यंत जाणार, ७ कोटींपर्यंत.”आता आदित्य हे ७ कोटींचा प्रश्न खेळून जोखीम घेणार आहेत. ते जिंकतात का नाही, हे पाहणं खूप रोचक ठरणार आहे.