
नवी दिल्ली: भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) नुकत्याच सुरू केलेल्या फास्टॅग वार्षिक पासला देशभरातील वाहनचालकांकडून जोरदार प्रतिसाद मिळत आहे. १५ ऑगस्टपासून ही योजना सुरू झाली असून, अवघ्या चार दिवसांत ५ लाखांहून अधिक वार्षिक पास बुक किंवा सक्रिय करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
काय आहे ही योजना?
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी घोषणा केल्यानुसार, वारंवार महामार्गावरून प्रवास करणाऱ्या खासगी वाहनधारकांसाठी ही विशेष योजना सुरू करण्यात आली आहे. या पासमुळे वर्षभरात २०० टोल प्लाझा क्रॉसिंगसाठी केवळ ३,००० रुपये भरावे लागतील. याचा अर्थ एका प्रवासासाठी सरासरी फक्त १५ रुपये खर्च येतो. ज्यामुळे नियमित प्रवासासाठी मोठ्या प्रमाणात पैशांची बचत होणार आहे.
मुख्य वैशिष्ट्ये आणि फायदे:
रक्कम : ३,००० रुपयांच्या एकाच पेमेंटमध्ये वर्षभरासाठी टोलची चिंता मिटेल.
वेळेची बचत: वारंवार फास्टॅग रिचार्ज करण्याची गरज नाही. टोल प्लाझावर न थांबता जलद प्रवास शक्य.
आर्थिक बचत: या पासमुळे सुमारे ७,००० रुपयांपर्यंतची बचत होऊ शकते, असा सरकारचा दावा आहे.
डिजिटल सुविधा: हा पास 'राजमार्गयात्रा ॲप' किंवा NHAI च्या अधिकृत वेबसाइटवरून ऑनलाइन खरेदी किंवा सक्रिय करता येतो.
केवळ खासगी वाहनांसाठी: ही योजना फक्त कार, जीप आणि व्हॅनसारख्या खासगी, गैर-व्यावसायिक वाहनांसाठी लागू आहे.
NHAI ने दिलेल्या माहितीनुसार, या योजनेमुळे देशभरातील महामार्गांवरील वाहतूक अधिक सुरळीत होईल, टोल प्लाझावरील गर्दी कमी होईल आणि प्रवासाचा अनुभव अधिक सोयीस्कर होईल.