Monday, August 18, 2025

जीएसबी गणेश मंडळाने उतरवला ४७४ कोटी रुपयांचा विमा

जीएसबी गणेश मंडळाने उतरवला ४७४ कोटी रुपयांचा विमा
मुंबई : गणेशोत्सवाला आता दहा दिवसांपेक्षा कमी कालावधी उरला आहे. अनेक मोठ्या गणेशमूर्तींचे मंडपांमध्ये आगमन झाले आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईतल्या जीएसबी गणेश मंडळाने ४७४ कोटी रुपयांचा विमा उतरवला आहे. गेल्या वर्षी या मंडळाने ४०० कोटींचा विमा उतरवला होता. मात्र यंदा या विम्यात आणखी ७४ कोटींची वाढ करण्यात आली आहे.

न्यू इंडिया इश्युरन्स कंपनीने जीएसबी गणेश मंडळासाठी हा विमा काढला आहे. यंदाच्या विम्यासाठी किती रुपये प्रिमियम आहे हे सांगण्यात आलं नाही. गोपनीयतेच्या कारणास्तव जीएसबी मंडळाने ४७४ कोटी रुपयांच्या विम्यासाठीचा प्रिमियम सांगण्यास नकार दिला आहे.

जीएसबी मंडळाकडे ६७ कोटींचे दागिने असल्याची माहिती आहे. सोनं आणि दागिन्यांचं मूल्य वाढल्याने यंदाच्या वर्षीचा विमाही वाढला आहे. जीएसबी मंडळातील स्वयंसेवक, पुजारी, आचारी, सुरक्षा कर्मचारी या लोकांनाही विम्याचं संरक्षण देण्यात आलं आहे. सोन्या-चांदीच्या दागिन्यांसोबतच नैसर्गिक आपत्तींमुळे होणाऱ्या नुकसानीचाही या विम्याच्या रकमेत समावेश आहे. ४७४ कोटी रुपयांच्या विम्यामध्ये सोने-चांदीच्या दागिन्यांसह आग, भूकंप, अपघात अशा सर्व आपत्तीचा विचार करुन हा विमा काढण्यात आला आहे.
Comments
Add Comment