
नवी दिल्ली: भारताचे पहिले अंतराळवीर म्हणून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर गेलेले ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत भेट घेतली. आपल्या या ऐतिहासिक अंतराळ मोहिमेतून नुकतेच भारतात परतलेल्या शुभांशू यांनी पंतप्रधान मोदींना एक खास भेट दिली. त्यांनी अंतराळात घेऊन गेलेला आणि भारताची शान म्हणून तेथे फडकवलेला 'तिरंगा' पंतप्रधान मोदींना भेट दिला.
या भेटीदरम्यान पंतप्रधान मोदी आणि शुभांशू शुक्ला यांच्यात विविध विषयांवर चर्चा झाली. शुभांशू यांनी अंतराळात मिळवलेले अनुभव, विज्ञान आणि तंत्रज्ञानातील भारताची प्रगती, तसेच भारताची महत्त्वाकांक्षी 'गगनयान' मोहीम यावर दोघांनी सविस्तर संवाद साधला. पंतप्रधान मोदी यांनी 'एक्स' वर एक पोस्ट करत या भेटीची माहिती दिली. त्यांनी लिहिले, "शुभांशू शुक्ला यांच्यासोबत एक उत्तम संवाद झाला. अंतराळातील त्यांचे अनुभव, विज्ञान आणि तंत्रज्ञानातील प्रगती तसेच भारताच्या महत्त्वाकांक्षी गगनयान मोहिमेवर आम्ही चर्चा केली. त्यांच्या या कामगिरीचा देशाला अभिमान आहे."
PM Narendra Modi tweets, "Had a great interaction with Shubhanshu Shukla. We discussed a wide range of subjects including his experiences in space, progress in science & technology as well as India's ambitious Gaganyaan mission. India is proud of his feat." (Pics: PM Narendra… pic.twitter.com/OTxCPEDKeq
— ANI (@ANI) August 18, 2025
शुभांशू शुक्ला यांनी अंतराळातून काढलेली पृथ्वीची काही छायाचित्रेही पंतप्रधान मोदींना दाखवली. ही चित्रे पाहिल्यानंतर पंतप्रधानांनी त्यांच्या कार्याचे कौतुक केले. शुभांशू शुक्ला यांनी अमेरिकेतील 'ॲक्सिओम-४' (Axiom-4) या खाजगी अंतराळ मोहिमेतून २५ जून ते १५ जुलै या कालावधीत आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर १८ दिवसांचा प्रवास केला. या काळात त्यांनी ६० हून अधिक वैज्ञानिक प्रयोग आणि २० हून अधिक कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला.
शुभांशू शुक्ला यांचे हे यश भारताच्या अंतराळ इतिहासातील एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. 'गगनयान' मोहिमेद्वारे भारताला स्वतःचे अंतराळवीर अंतराळात पाठवायचे आहेत आणि शुभांशू यांचा अनुभव यात महत्त्वपूर्ण ठरेल.