Monday, August 18, 2025

गेटवे ते मांडवा फेरीबोट १ सप्टेंबरपासून सुरू

गेटवे ते मांडवा फेरीबोट  १ सप्टेंबरपासून सुरू

मुंबई :  तीन महिन्यांच्या बंदीनंतर गेटवे ते मांडवा जलवाहतूक १ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. गौरी-गणपतीच्या सणासाठी अलिबाग-मुरुडमधील चाकरमान्यांचा हा सर्वात आवडीचा मार्ग असला तरी यंदा गणेश चतुर्थीला येणाऱ्यांना या सेवेचा लाभ घेता येणार नाही; मात्र परतीचा प्रवास फेरीबोटीने सुखरूप करता येणार आहे. सध्या सुरू असलेल्या पावसाचे प्रमाण कमी होऊन फेरीबोट निर्धारित वेळापत्रकानुसार सुरू होईल, असा अंदाज जलवाहतूक संस्थांचा आहे.


मॉन्सून सुरू होण्यापूर्वी गेटवे ऑफ इंडिया ते मांडवापर्यंतची फेरीबोटसेवा बंद होती. मेरिटाइम बोर्डाने १ सप्टेंबरपासून या मार्गावरील फेरीबोट सुरू करण्यास अनुमती दिली आहे. त्यानुसार अजंठा, मालदार, पीएनपी या वाहतूक संस्थांनी आपल्या फेरीबोटी सज्ज ठेवल्या आहेत. परतीच्या प्रवासासाठी फेरीबोटीचा वापर करता येणार आहे. १ सप्टेंबरपासून फेरीबोट सुरू झाल्यानंतर गौरी विसर्जन झाल्यानंतर परतीचा प्रवास सुखरूपपणे करता येणार आहे.


याचे नियोजन आतापासूनच अनेकजण करू लागले आहेत. मागील तीन दिवसांपासून जिल्ह्यात पावसाचे प्रमाण वाढलेले आहे. १ सप्टेंबरपासून जलवाहतूक वेळेत सुरू करण्याचा प्रयत्न फेरीबोट संस्थांचा आहे. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी साधारणपणे २६ जूनपासून दरवर्षी फेरीबोटसेवा बंद केली जाते; मात्र यादरम्यान आकाराने मोठी असलेली रो-रो बोट सुरू असते. नारळी पौर्णिमेनंतरही अनेकवेळा समुद्र शांत झालेला नसतो. त्यामुळे ही सेवा थेट सप्टेंबरमध्ये सुरू केली जाते, अशी माहिती पीएनपी मेरिटाइम सर्व्हिसेसचे व्यवस्थापक संजय भोपी यांनी दिली. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी मेरिटाइम बोर्डाने कडक धोरण अवलंबणे गरजेचे आहे.

Comments
Add Comment