Monday, August 18, 2025

कबुतरांना नियंत्रित पद्धतीने खाद्य पुरवा

कबुतरांना नियंत्रित पद्धतीने खाद्य पुरवा

पालिकेने मागवल्या हरकती आणि सूचना


मुंबई : कबुतरखान्यांच्या ठिकाणी कबुतरांना नियंत्रित पद्धतीने खाद्य पुरवण्याबाबत मुंबई महापालिकेकडून विचार केला जात आहे. याबाबत आलेल्या तीन अर्जांवर उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मुंबई महापालिकेने नागरिकांकडून हरकती व सूचना मागवल्या आहेत. दादरमधील कबुतरखाना बंद करण्यावरून सध्या मोठा वाद सुरू असून हा वाद न्यायालयापर्यंत पोहोचला आहे. या विषयावरून राजकीय वातावरणही चांगलेच तापले आहे. तसेच जैन समाजात प्रचंड नाराजी निर्माण झाली आहे. अखेर पर्यायी व्यवस्था होत नाही तोपर्यंत नियंत्रित पद्धतीने खाद्य देण्यात यावे व कबुतरखाना बंद करू नये असे आदेश राज्य सरकारने ७ ऑगस्टला दिले होते.


मुंबई महापालिकेने कबुतरांना खाद्य घालण्यास मनाई केल्यानंतर काही पक्षीप्रेमींनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. या याचिकेवर १३ ऑगस्टला झालेल्या सुनावणीच्यावेळी कबुतरांना खाद्य घालण्यावरील बंदीचा मुंबई महापालिकेचा निर्णय उच्च न्यायालयाने कायम ठेवला. मात्र दादर येथील कबुतरखान्याजवळ कबुतरांना दररोज सकाळी सहा ते आठ या कालावधीत खाद्य देण्याच्या मागणीवर विचार सुरू असल्याची माहिती महापालिकेने उच्च न्यायालयात दिली.


मुंबईतील कबुतरखान्यांबाबत बृहन्मुंबई महानगरपालिकेला दादर कबुतरखाना ट्रस्ट बोर्ड, यास्मिन भन्साळी अँड कंपनी आणि पल्लवी पाटील, अँनिमल अँड बर्डस् राईटस् अॅक्टिविस्ट यांच्याकडून अर्ज प्राप्त झाले. हे तिनही अर्ज बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या संकेतस्थळावरील


https://portal.mcgm.gov.in/irj/portal/anonymous?guest_user-english या लिंकवर अवलोकनासाठी उपलब्ध आहेत.


नागरिकांनी संकेतस्थळावर दिलेल्या या अर्जांचे अवलोकन करून कबुतरखान्यांच्या ठिकाणी नियंत्रित पद्धतीने व ठरावीक वेळेतच कबुतरांना खाद्य पुरवावे किंवा कसे, तसेच यातील अन्य मुद्द्यांबाबत त्यांच्या हरकती / सूचना suggestions@mcgm.gov.in या ईमेल आयडीवर सोमवार ते शुक्रवार या कालावधीदरम्यान पाठवाव्यात, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे. तसेच, सदर हरकती / सूचना लेखी स्वरुपात प्रत्यक्ष सादर करावयाच्या असतील तर त्या ‘कार्यकारी आरोग्य अधिकारी, तिसरा मजला, एफ दक्षिण विभाग कार्यालय इमारत, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, परळ येथे या कालावधीदरम्यान कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी कार्यालयीन वेळेत सादर कराव्यात, असे प्रशासनाकडून आवाहन करण्यात येत आहे.

Comments
Add Comment