
दापोली तालुक्यातील मुरुड येथील लक्ष्मीनारायण मंदिर ते कर्दे याजवळ रस्त्यावरील जवळजवळ वीस ते पंचवीस घरांचा संपर्क तुटला आहे.नागरिकांनी पावसाचा इशारा व आज देण्यात आलेला रेड अलर्ट लक्षात घेऊन आवश्यकता असल्यास घराबाहेर पडावे, तसेच आपल्या भागात परिसरात पाणी भरल्यास कोणतीही मदत लागल्यास आपत्कालीन परिस्थितीत गावातील पोलीस पाटील, तलाठी, सर्कल यांना संपर्क करावा असा आवाहन दापोली तहसीलदार यांनी केल आहे. दापोलीमधील बुरोंडी गावात पूर आला असून जनजीवन विस्कळीत झालं आहे घरांमध्ये पाणी शिरला असून मदतीची मागणी केलीय.
दापोली प्रशासन आणि बुरोंडी ग्रामपंचायतकडे मदतीची मागणी नागरिकांनी केली आहे.दाभोळ दापोलीमध्ये सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे दाभोळ-दापोली मार्गावरील मुख्य रस्त्यावरील नानटे पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे वाहतूक पूर्णतः ठप्प झाली आहे. मुख्य रस्ता बंद असल्याने नागरिक आणि वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
पाण्याचा प्रवाह वेगवान असल्यामुळे रस्ता तात्पुरता बंद आहे. तसेच, दापोली तहसीलदार कार्यालयाच्या आसपासच्या परिसरात देखील पाणी साचल्यामुळे कामकाजावर परिणाम झाला आहे. कार्यालयात ये-जा करणाऱ्या नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. स्थानिक प्रशासन व आपत्कालीन यंत्रणा परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा व अधिकृत सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
दापोली आणि खेड शहरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे दापोली आणि खेड रोडवर मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे. पाण्याचा प्रवाह इतका वेगवान आहे की प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून रस्ता तात्पुरता बंद केला आहे.पाण्यामुळे रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. वाहनचालक आणि प्रवाशांनी या मार्गाचा वापर टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पर्यायी मार्गांचा वापर करण्यास सांगण्यात आले असून, आपत्कालीन सेवा आणि प्रशासन सतर्क आहे. नागरिकांनी हवामान खात्याच्या आणि स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.