Monday, August 18, 2025

नायजेरियामध्ये बोट उलटली, ४० लोक बेपत्ता; बचावकार्य सुरू

नायजेरियामध्ये बोट उलटली, ४० लोक बेपत्ता; बचावकार्य सुरू

अबुजा: नायजेरियामध्ये एक मोठी बोट दुर्घटना घडली आहे. ५० प्रवाशांना घेऊन जाणारी एक बोट उलटून ४० लोक बेपत्ता झाले आहेत. बचावकार्य युद्धपातळीवर सुरू असून, आतापर्यंत १० जणांना वाचवण्यात यश आले आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, नायजेरियातील नायजर राज्यातील शिरोरो भागात ही दुर्घटना घडली. ही बोट कोगी राज्यातील एका बाजाराकडे जात होती, त्यावेळी ती नदीत उलटली. या बोटीत क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी होते. त्यामुळे हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. बेपत्ता झालेल्यांमध्ये बहुतांश महिला आणि मुलांचा समावेश असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.


स्थानिक आपत्कालीन सेवा एजन्सी आणि प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून, बेपत्ता लोकांचा शोध घेण्यासाठी मोहीम सुरू करण्यात आली आहे. पाणबुड्यांच्या मदतीने शोधकार्य वेगाने सुरू आहे. मात्र, या भागात सशस्त्र गटांचा वावर असल्यामुळे बचावकार्यात अडचणी येत आहेत.


नायजेरियामध्ये पावसाळ्याच्या काळात जुन्या आणि क्षमतेपेक्षा जास्त भार असलेल्या बोटींमधून प्रवास करताना अशा दुर्घटना वारंवार घडतात. या घटनेनंतर राष्ट्राध्यक्षांनी अंतर्देशीय जलमार्गांच्या देखरेखीची व्याप्ती वाढवण्याचे आणि रात्रीच्या प्रवासावर बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत.


Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा