
वार्तापत्र: कोकण
कोकणातील रत्नागिरी, विजयदुर्ग, देवगड, मालवण, वेंगुर्ले या बंदारांमध्ये ही प्रवासी बोट यायची. १९५२ पूर्वी कोकणात बाँम्बे स्टीम इव्हीगेशन कंपनीतर्फे कोकणात माल व प्रवास वाहतूक केली जात होती. कोकणसेवक व कोकणशक्ती नावाच्या दोन प्रवासी वाहतूक करणाऱ्या बोटी कोकणच्या बंदरांमध्ये यायच्या. ‘तुकाराम’ नावाची बोटही भाऊच्या धक्क्यावरून कोकणात यायची. १९७२ साली रोहीणी या प्रवासी बोटीला मालवणजवळ समुद्रात अपघात झाला; परंतु त्या रोहिणी बोटीच्या अपघातात कोणतीही मनुष्यहानी झाली नाही. काँग्रेसच्या सत्ताकाळात स्व. भाईसाहेब सावंत मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री असताना ‘कॅटमरेन’ नावाची प्रवासी वाहतूक करणारी बोट सुरू होणार होती. एकदा प्रायोगिकतेवर ‘कॅटमरेन’ बोट कोकणातील बंदरात आली; परंतु त्यानंतर ती पुन्हा काही बोट आली नाही. त्यामुळे मुंबईच्या भाऊच्या धक्क्यापासून सुरू होणारा कोकणातील बोटींचा प्रवास नंतरच्याकाळात कोकणात येणारे मार्ग आणि दळणवळणाची साधने यामुळे साहजिकच मुंबईतून बोटीने होणारी प्रवासी वाहतूक थांबली आणि कोकणातील बंदरांनाही अवकळा आली.
कोकणच्या किनारपट्टीला बोट वाहतूक असताना रेवस ते रेड्डी या सागरी मार्गावरील गाव आणि बंदरे यांच अस्तित्वच नष्ट झालं. विजयदुर्गसारखं छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठा साम्राजाचा आरमारी मुख्य तळ म्हणून आणि पश्चिम किनारपट्टीवरील एक अभेद्य असे सागरी सत्ताकेंद्र म्हणून ओळखले जात होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात या बंदरांमध्ये मोठ्या जहाजांची ये-जा होती. वेंगुर्लेसारख्या बंदरातही परदेशी मालवाहू बोटी यायच्या. बेळगावच्या बाजारपेठेत वेंगुर्ले बंदरातून आवक-जावक व्हायची. नंतरच्या काळात प्रवासी वाहतुकीपुरता या बंदरांचा वापर होऊ लागला; परंतु पन्नास वर्षांत स्थानिकस्तरावर मासेमारीसाठी या बंदरांचा उपयोग होऊ लागला. यामुळे खऱ्या अर्थाने या बंदरांचे एकेकाळचे व्यावसायिक महत्त्व कमी-कमी होत गेले. आज फक्त कोकणच्या रेवस(रायगड) ते रेड्डी (सिंधुदुर्ग) या बंदरांमध्ये आता फक्त मच्छीमारी डॉलर्स दिसतात; परंतु कोकणच्या सुदैवाने मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्रीपद नितेश राणे यांच्याकडे आल्यानंतर कोकणच्या किनारपट्टीवर विकासाचा आशेचा किरण दिसू लागला. विकासाच्या दूरदृष्टीने विचार करणाऱ्या मंत्री नितेश राणे यांनी माझगाव डॉक ते विजयदुर्ग बंदरापर्यंत रो-रो कार वाहतूक करणारी बोट सेवा सुरू करण्याचा महत्त्वाकांक्षी आणि कोकणच्या बंदर विकासाला चालना देण्याचा त्यांचा प्रयत्न असून, मुंबई ते विजयदुर्ग हा प्रवास पाच तासांमध्ये अपेक्षित आहे. विजयदुर्ग बंदरामध्ये रो-रो कार वाहतूक करणारी बोट वाहतूक सुरू होत आहे.
कोकणात मोठ्या प्रमाणावर साजरा होणाऱ्या गणेशाेत्सवकाळात मुंबई ते सिंधुदुर्ग हा कोकण प्रवासाच्या जलमार्गाचा प्रवास सुरू होत असल्याने साहजिकच विजयदुर्ग बंदराला यानिमित्ताने निश्चितच ऐश्वर्य प्राप्त होईल. विजयदुर्ग बंदरामध्ये सुरू होणाऱ्या या रो-रो कारसेवेने कोकणात येण्याचा एक नवा जलमार्ग तयार झाला आहे. कोकणात प्रवासी बोट वाहतूक बंद झाल्यानंतर कोकणातील बंदरांना आलेली अवकळा यानिमित्ताने दूर होण्यास निश्चितच मदत होणार आहे. भविष्यात विजयदुर्ग बंदराला पुन्हा उर्जितावस्था आणण्यासाठी अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्प प्रस्तावित आहे. यामध्ये महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डाच्या सहकार्याने उभारल्या जाणाऱ्या ‘ग्रीनफिल्ड’ पोर्टच्या आणि जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट(जेएनपीटी) च्या सॅटेलाईट पोर्टच्या योजनांचा समावेश आहे. मात्र या सर्व योजनांना आवश्यक असलेल्या महत्त्वाच्या पायाभूत सुविधा निर्माण कराव्या लागणार आहेत. निश्चितच त्यासाठीही मत्स्यद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे प्रयत्न करतीलच. प्रस्तावित असणारा कोल्हापूर-वैभववाडी रेल्वेमार्ग जर तयार झाला तर कोकणातील सुरक्षित असणाऱ्या विजयदुर्ग बंदरामध्ये मालवाहतूकही शक्य होऊ शकेल. मध्यंतरी विजयदुर्ग बंदरातून मोठ्या प्रमाणावर मोठ्या जहाजातून साखर कारखान्यातील मळीची वाहतूक करण्यात येत होती; परंतु अलीकडे ही वाहतूकही बंद होती. रो-रो कारसेवेने पुन्हा एकदा कोकण विकासाचा नवा मार्ग दिसू लागला आहे. कोकणच्या विकासातील हे सारे बदल आणि विकासाच्या दिशेने होणारी वाटचाल निश्चितच कोकणच्या सर्वांगीण विकासाला गती देणारी आहे. कोकणातील बंदरांमध्ये मुंबईतून कार घेऊन रो-रो सेवा होऊ शकते याची कल्पनाही कोणी केली नव्हती; परंतु त्यासाठीचे प्रयत्न महाराष्ट्राचे मत्स्यद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी केले आहे.
कस काय शक्य आहे असं अनेकांना वाटलं. भुवया उंचावल्या; परंतु जे इतर कोणी करूच शकत नाही. नेहमी तो विचार आणि ते कार्य राणे करतातच. हे अनेकवेळा अशा उपक्रमांमुळे सिद्ध झाले आहे. मुंबई-गोवा महामार्गाचे काम अद्यापही अपूर्ण आहे. मुंबईकर चाकरमान्यांना मुंबई ते कोकणचा हा प्रवास महामार्गाने फारच अवघड आणि दहा-बारा तासांचा झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर पाच-सहा तासात मुंबई ते विजयदुर्गचा प्रवास होणार आहे. यामुळे साहजिकच कोकणवासीय विशेषत: सिंधुदुर्गवासीय या रो-रो बोट सेवेचा लाभ घेऊ शकतात. या रो-रो सेवेला कोकणवासीय मोठा प्रतिसाद देतील असे अपेक्षित आहे.
- संतोष वायंगणकर