
श्रीगोंदा : सुरोडी (ता. श्रीगोंदा) येथील मिनाक्षी रामदास सकट (वय ३८ ) यांच्यावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला . मिनाक्षी यांनी प्रसंगावधान राखत मुलासह रस्त्यावरून पळ काढत आपला जीव वाचवला . या घटनेत त्यांची दुचाकी गाडी जळून खाक झाली .
याबाबत मिनाक्षी सकट यांनी श्रीगोंदा पोलीस स्टेशनमध्ये दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, त्या रविवार, दि. १७ ऑगस्ट २०२५ रोजी रात्री सुमारे ८.१० वाजता आपला मुलगा सार्थक याच्यासह स्वतःच्या हिरो-होंडा प्लेझर स्कुटीवरून वडाळी रोडने घरी परतत असताना पोटे मळ्याजवळील कच्च्या रस्त्यावर ही घटना घडली.
त्यावेळी अंधारात एक इसम टॉर्च चमकवत असल्याने त्यांची गाडी घसरली. लगेचच गावातील ओळखीचा शरद लाटे हा धावत आला. त्याने हातातील बाटलीतील पेट्रोल मिनाक्षी यांच्या अंगावर आणि स्कुटीवर फेकले. तसेच केस धरून मारहाण केली व "माझ्यावर दाखल केलेली केस मागे घे, नाहीतर तुला जिवंत सोडणार नाही" अशी धमकी दिली.
यानंतर आरोपीने माचीसची काडी पेटवून त्यांच्या अंगावर फेकली. मिनाक्षी सकट यांनी प्रसंगावधान राखत बाजूला पळ काढल्याने त्या वाचल्या, मात्र पेटलेली काडी त्यांच्या स्कुटीवर पडून स्कुटी जळून खाक झाली. यावेळी त्यांच्या साडीला देखील आग लागली , मात्र त्यांनी प्रसंगावधान राखत जळणाऱ्या वस्त्रांवर हाताने झटके देऊन आग विझवली.
घटनास्थळावर मोठ्या आवाजात आरडाओरडा सुरू झाल्याने आरोपी शरद लाटे हा घटनास्थळावरून पळाला व एका अनोळखी इसमाच्या मोटारसायकलवर बसून सुरोडी रोडच्या दिशेने फरार झाला.
मीनाक्षी सकट या मातंग समाजातील असून, ग्रामसभेत जातीवरून अपमानित करणे, त्यांच्या वडिलोपार्जित जागेत बेकायदेशीर अतिक्रमण करणे, तसेच पोकलेन लावून वाढदिवस साजरा करणे या कारणांवरून यापूर्वी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात संदीप वागस्कर, विलास वागस्कर व शरद लाटे यांच्यावर अॅट्रॉसिटी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा राग मनात धरूनच हा पेट्रोल हल्ला झाल्याचा आरोप आहे.
या प्रकरणी मिनाक्षी सकट यांनी शरद लाटे व एका अनोळखी इसमाविरुद्ध श्रीगोंदा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून अधिक तपास सुरू केला आहे. मिनाक्षी सकट ह्या विद्यमान सरपंच आहेत . त्यांच्यावर झालेल्या या जीवघेण्या हल्ल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरणात आहे.