
कल्याण : कल्याण शीळ रस्त्यातील खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातात कल्याणातील एका तरुणाला जीव गमवावा लागला आहे. रोहन शिंगरे हा तरुण कल्याण पश्चिमेतील रामबाग येथील आरती सोसायटी येथे राहत होता. तो वाशी येथील खासगी बँकेत कामाला होता. कामावर जाण्यासाठी तो दररोज त्याच्या बाईकने कल्याण ते वाशी असा प्रवास करायचा.

२३ जुलै रोजी नेहमीप्रमाणे कामावर जाण्यासाठी बाईकने निघला होता. साडेनऊच्या सुमारास त्याची बाईक कल्याण शीळ रस्त्यावरील पिंपळेश्वर परिसरात पोहोचली असता त्या ठिकाणी रस्त्यातील खड्यात त्याची बाईक जोराने आदळली. त्यामुळे रोहनचा तोल गेला आणि रस्त्यावर पडला त्याचवेळी त्याच्या मागून भरघाव येणाऱ्या ट्रँकच्या चाकाखाली त्यांचा हात गेला. हातावरून चाक गेल्याने तो गंभीर जखमी झाला.
त्याच्याच मोबाइल वरून काही जणांनी फोन करून त्याच्या वडिलांना अपघाताची बातमी दिली. हे ऐकताच त्यांना धक्का बसला, त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. रोहनला उपाचार्थ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर वाशीतील महात्मा फुले ट्रस्ट रूग्णालयात हलविले, उपाचारादरम्यान त्यांचा एक हात काढवा लागला, त्याची प्रकुती सुधारत असताना अचानक प्रकृती बिघडली आणि उपचारदरम्यान १५ ऑगस्ट रोजी त्याचा मुत्यू झाल्याने त्यांच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
रोहनची बहीण रिद्धी हिने प्रसिद्धी माध्यामांना सांगितले की, ''खड्ड्यांमुळे माझ्या भावाचा जीव गेला. आणखी कोणाचा जीव जाऊ नये, प्रशासनाने वेळीच उपाय योजना केली पाहिजे." खड्डे बुजविले पाहिजेत असे ती म्हणाली.