रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोलीमध्ये कस्टम विभागाने गोवा किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळील समुद्रकिनाऱ्यावर ४ किलो १४० ग्रॅम वजनाची दुर्मीळ व्हेल माशाची उलटी जप्त केली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात या अंबरग्रीसची किंमत ५.४५ कोटी रुपये इतकी असल्याचे कस्टम विभागाने प्रसिद्धीस दिलेल्या माहितीत म्हटले आहे.
कस्टम विभागाला गोवा किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळ, पांढऱ्या समुद्रकिनारी एका हलक्या तपकिरी रंगाचा आणि अत्यंत चिकट जेलीसारखा गोळा असल्याची माहिती मिळाली होती. सीमाशुल्क विभागाचे सहायक आयुक्त संदीप कृष्णा यांच्या मार्गदर्शनाखाली दापोली सीमाशुल्क विभागाचे अधीक्षक अतुल व्ही. पोतदार आणि अधीक्षक विकास जाखर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने तात्काळ शोधमोहीम सुरू केली.
कस्टम विभागाच्या या जलद कारवाईमुळे ४ किलो १४० ग्रॅम अंबरग्रीस जप्त करण्यात आले. औषधनिर्मितीमध्ये या अंबरग्रीसचा वापर होतो. त्यामुळे त्याची तस्करी मोठ्या प्रमाणावर होते. या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.