Tuesday, September 9, 2025

वर्धा : वीज कोसळून एकाचा मृत्यू, सात जण जखमी

वर्धा : वीज कोसळून एकाचा मृत्यू, सात जण जखमी
विदर्भात मुसळधार पाऊस सुरु असून वर्धा, बुलढाणा आणि भंडारा जिल्ह्यांत मुसळधार पावसाने हजेरी लावलीय. वर्धा जिल्ह्यातील हिरापूर (तळणी) येथे शेतात शनिवारी फवारणी करत असताना शेतात आडोशाला उभ्या असलेल्या झाडावर दुपारी १.३० वीज कोसळल्याने वृषभ कोटगले वय २२ या तरुणाचा मृत्यू झाला, तर तीन जण जखमी झाले. वृषभ कोटगले याने शनिवारी स्वप्नील कोडापे, संजय गोळे आणि विष्णू भोयर यांना सोबत घेऊन शेतात फवारणी केली. शेतामध्ये काम करत असताना पावसाने हजेरी लावली. यावेळी स्वप्नील, संजय आणि विष्णू या तिघांनी एका झाडाखाली आसरा घेतला तर वृषभ हा जवळच्याच दुसर्‍या झाडाखाली आडोशाला थांबला. यावेळी ढगांच्या गडगडाटासह पाऊस सुरू असतानाच वृषभ उभा असलेल्या झाडावर वीज कोसळली आणि यात घटनास्थळीच त्याचा मृत्यू झाला. दरम्यान स्वप्नील कोडापे, संजय गोळे आणि विष्णू भोयर हे जखमी झाले. पुलगाव पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. वृषभ कोटगले हा कुटुंबाचा एकमेव आधार होता. वृषभच्या वडिलांचे पाच वर्षांपूर्वीच निधन झाले आहे. त्यामुळे वृषभच्या खांद्यावर शेती आणि संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी असताना कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पश्चात बहीण, आई आणि आजी-आजोबा असा परिवार आहे.
Comments
Add Comment