क्राइम: अॅड. रिया करंजकर
माणसाचं आयुष्य म्हटलं की त्या आयुष्यासोबत अनेक स्वप्न येतात आणि ती स्वप्न प्रत्यक्षात उतरण्यासाठी माणूस काबाडकष्ट करून तो आपली स्वप्न पूर्ण करतो. ही स्वप्न पूर्ण करण्यासाठी काही बँकांनी, पतसंस्थेने आपला हात पुढे केलेला आहे आणि अशा प्रकारे माणसांची स्वप्नं बँकांच्या कर्जामार्फत पूर्ण केली जात आहेत. पूर्वी लोक सेवानिवृत्त झाल्यानंतर आपल्या स्वप्नातील घर घेत होते पण आता काळ बदललेला आहे. तरुण पिढी नोकरीला लागल्यानंतर लगेचच कर्ज घेऊन घर घेत आहेत. असेच दिनकरने पतसंस्थेकडून १२ लाखाचं कर्ज घेतलं होतं. दिनकर हा शाळेमध्ये शिक्षक होता. शिक्षकांच्या असलेल्या पतसंस्थेमधून त्यांनी कर्ज घेतलं होतं आणि त्याला जामीनदार म्हणून आपल्या शाळेतील तीन शिक्षकांना सह्या करायला लावले होते.
जामीनदारांनी त्याच्यावर विश्वास ठेवून सह्या केल्या होत्या; परंतु एवढे वर्षे त्यांच्यासोबत काम करत होता. जामीनदार असलेल्या सुरेश, बाळाराम, सुभाष यांनी असाही विचार केला की जेव्हा आपल्याला कर्जाची गरज भासेल तेव्हा दिनकर सही करेल. दिनकर याला पतसंस्थेकडून १२ लाखाचं कर्ज मिळालं. त्याने नऊ महिने २०००० असा मासिक हप्ताही भरला होता आणि कर्ज घेतल्यानंतर बरोबर नऊ महिन्यांनी त्यांनी शाळेमधून सेवानिवृत्ती घेतली. २०१४ मध्ये त्यांनी कर्ज घेतलं होतं आणि २०१५ मध्ये त्यांनी सेवानिवृत्ती घेतली. सेवानिवृत्ती घेतल्यानंतर त्यांनी एकही हप्ता पतसंस्थेमध्ये भरला नाही. ही गोष्ट जामीनदार सुरेश, बाळाराम आणि सुभाष यांना कळली. त्यावेळी सुरेश यांनी दिनकर यांच्याकडून तीन चेक घेऊन ते पतसंस्थेत दिले. पतसंस्थेत चेक देताना त्यांनी दिनकरलाही सोबत नेले होते. सुरेशला वाटलं की, ते चेक वाटले असतील आणि दिनकर याचं कर्ज फेडलं असेल. कारण त्यांनी सेवानिवृत्ती घेतल्यामुळे त्याला त्याच्या नोकरीचा मोबदला मिळालेला होता. पतसंस्थेने दिनकर हप्ते भरत नाही अशी तक्रार दाखल केली होती. दिनकरने माझ्या पत्नीचा मृत्यू झाल्यामुळे आर्थिक अडचणीत असल्यामुळे पतसंस्थेचे कर्ज त्यांना दाखवलं.
त्याशिवाय त्याची गावातील जमीन दाखवली. त्यावेळी दिनकर यांनी वसुली अधिकाऱ्यासमोर मी कर्ज फेडेन जामीनदारांना त्रास देऊ नका असे सांगितलं होतं. काही दिवस निघून गेल्यावर सुरेश आणि सुभाष यांच्या गावाला वसुली अधिकाऱ्यांचं पत्र गेलं. या दोघांच्या नावावर जी काही स्थावर मालमत्ता आहे ती पथसंस्थेला सांगितल्याशिवाय या मालमत्तेचा कोणताही व्यवहार केला जाणार नाही. कारण सुरेश आणि सुभाष जामीन असल्यामुळे त्यांची गावाकडची मालमत्ता ही पतसंस्थेच्या अधिपत्याखाली आहे असं पत्र त्यांनी ग्रामपंचायतमध्ये पाठवलं. त्याच्यामुळे सुरेश आणि सुभाष यांना नेमकं काय झालं तेच समजेना. कारण दिनकरने जे काही पतसंस्थेला दिले होते त्याची गावी असलेली स्थावर आणि जंगम मालमत्ता ही दाखवली तरी वसुली अधिकारी का वसूल करत नाही असा प्रश्न सुरेशला पडला.
दिनकरची एवढी प्रॉपर्टी दाखवूनही त्याची जप्ती अजूनपर्यंत झालेली नाहीये. वसुली अधिकारी उपनिबंधक यांच्याकडे दिनकरला हजर करून त्याची वसुली का केली जात नाही असा प्रश्न सुरेशला पडला होता. एवढ्या वर्षे नोकरी केल्यानंतर आपली सर्विस सेवानिवृत्त झाल्यानंतरही ती परस्पर पतसंस्थेला जाणार आहे. या गोष्टीमुळे सुरेश आणि सुभाष दोघांनाही मानसिक ताण येऊ लागला. आपण विश्वासाने सही केली होती. कारण आपल्यालाही कधी कर्जाची गरज भासली तर दिनकर पण आपल्याला मदत करेल असे तिघांना वाटले होते. पण वसुली अधिकारी दिनकरकडून काहीच वसुली करत नाही म्हणजे यांच्यामध्ये मिलीभगत आहे का, हाही प्रश्न सुरेश आणि सुभाषला पडला. कारण सतत वसुली अधिकारी सुरेश आणि सुभाष यांनाच जप्तीची पत्रं पाठवत होता. त्यामुळे आता आपलं आर्थिक नुकसान होणार आहे. यामुळे दोघेही हतबल झालेले होते.