Sunday, August 17, 2025

तुझ्या हाताच्या चवीचं...

तुझ्या हाताच्या चवीचं...

प्रतिभारंग : प्रा. प्रतिभा सराफ


बाबा सरकारी नोकरीत सुपरिटेंडंट होते. त्यामुळे त्यांची नियुक्ती महाराष्ट्रात कोणत्याही ठिकाणी व्हायची. कधी सोलापूर, कधी नागपूर, कधी अलिबाग, कधी आणखी कुठे... अशीच बाबांची नियुक्ती जालनाला झालेली होती. औरंगजेबाच्या सरदाराचा प्रशस्त बंगला आता महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात असल्यामुळे सरकारी खात्यातील माणसांना तो राहण्यासाठी मिळायचा. अशाच एका प्रचंड मोठा बंगला बाबांना मिळाला होता. नोकरीच्या ठिकाणी बाबा एकटेच राहायचे आणि आम्ही मुली आईसोबत मुंबईत. कारण आई बी. एम. सी. मध्ये शिक्षिका होती. शाळेला सुट्टी पडली की आई आणि आम्ही मुली बाबांकडे जायचो.


बाबा जालनाला होते तेव्हा त्यांच्याकडे एक स्वयंपाकी होता. आम्ही गेलो की सकाळच्या नाश्तापासून रात्रीच्या जेवणापर्यंत नुसती चंगळ असायची. अगदी साधे पोहे असो किंवा व्हेज बिर्याणी, दह्यातली कोशिंबीर असो नाही तर भजी घातलेली ताकातली कढी, कोणताही पदार्थ तो अतिउत्तम बनवायचा. दोन दिवस आई आमच्यासोबत आनंदाने खायची. मग मात्र तिला त्याचे पदार्थ करताना पाहून गरगरायचे.


म्हणजे बाकी सर्व मसाल्याचे पदार्थ वगैरे तो व्यवस्थित घालायचा; परंतु सर्व पदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणात तेल वापरायचा. पोळ्या थपथप तुपाच्या अगदी तळून काढल्यासारख्या आणि भाज्या हॉटेलसारखा तेलाचा तवंग असलेल्या! पालेभाज्यांमध्ये आणि कोशिंबिरीमध्ये सरसरून वरून तेलाची फोडणी आणि शिरा वा तत्सम गोड पदार्थात ड्रायफ्रूट्स आणि तुपाची रेलचेल! मग काय साखरेत घोळलेले, तुपात लोळलेले आणि तेलात डुंबलेले कोणतेही पदार्थ चांगलेच लागणार ना!


जेवणावरून दोन गोष्टींसाठी आई चिडायची. एक तर मोठ्या प्रमाणात वापरलेल्या तेलातुपामुळे आणि दुसरे आणि महत्त्वाचे कारण म्हणजे आम्ही उन्हाळ्यात दीड महिना बाबांकडे राहायचो. कमीत कमी त्या काळात तरी बाबांना आपल्या हाताने त्यांच्या आवडीचे पदार्थ प्रेमाने तयार करून वाढावे, असे आईला वाटायचे. आम्ही मुली मात्र त्या स्वयंपाक्याच्या हाताचे खायला तरसायचो. हे पदार्थ चविष्ट असायचेच; परंतु चवीत बदल म्हणून अधिकच रुचकर लागायचे. मग आम्ही मधला मार्ग काढला. सकाळचा नाष्टा आणि रात्रीचे जेवण स्वयंपाकी बनवायचा आणि दुपारचे जेवण आई बनवायची!


तशी आईच्या हातची चव मुलींना लग्न झाल्यानंतर कधीतरी चाखायला मिळते. त्यामुळे त्या माहेरी आल्यावर आईला, ‘तुझ्या हातचं मला हे आवडतं, ते आवडतं.’ असं सांगून खूप सारे पदार्थ करायला लावतात. तर मुलांच्या बाबतीत फार काही वेगळे घडत नाही. बायको घरी आली की तिच्या हातचे त्याला सगळे आवडू लागते. नवलाईचे चार दिवस संपल्यावर काही दिवसात तो आईला सांगतोच की, ‘आई हे बनव, ते बनव, तुझ्या हातचं हे मला खावंस वाटतंय!’


आपण जेव्हा शाळा - कॉलेजमध्ये किंवा नोकरीच्या ठिकाणी जातो तेव्हा आपला डबा सोडून आपल्याला दुसऱ्यांचा डबा आवडतो. एखाद्या ठिकाणी फिरायला गेलो की त्या हॉटेलमधले दोन-तीन दिवस जे काही असेल ते खूप आवडते. नंतर त्याचा कंटाळा येतो. मी एम. एस्सी. शिकत असताना मला बी. ए. आर. सी. चे लायब्ररी कार्ड मिळाले होते. कारण ही लायब्ररी माझ्या घराच्या अगदी जवळ होती.


तिथल्या कॅण्टीनमध्ये साधारण बाजारभावापेक्षा पाच ते दहा टक्के किमतीत कोणताही पदार्थ मिळायचा. माझ्या आसपासच्या टेबलावर असंख्य माणसे घरचा डबा घेऊन जेवत बसलेली दिसायची तेव्हा मला खूप नवल वाटायचे. इतक्या स्वस्तात ते गरम गरम छान जेवण मिळत असताना हे घरून कशाला डबा आणतात? म्हणजे जेव्हा मी आईला तिकडच्या पदार्थांची किंमत सांगितली तेव्हा आई म्हणाल्याचे आठवतेय की, आपण घरी बनवलेल्या पदार्थांपेक्षाही कमी किमतीत तुम्हाला जेवण मिळतेय. दहा-पंधरा दिवस मी कॅण्टीनमध्ये जाऊन मस्त आडवा हात मारला होता पण त्यानंतर मला त्या पदार्थांचा कंटाळा येऊ लागला.


बदलून बदलून मी वेगळे वेगळे पदार्थ खात होते. एक दिवशी तर मला काहीच खावे वाटेना मग मी कॉफी पिऊन तिकडून निघाले. दुसऱ्या दिवशी आईकडून डबा घेऊन गेले आणि तिथे येणाऱ्या असंख्य लोकांप्रमाणे मीही आपल्या डब्यातले खाऊ लागले. मनात विचार आला आपण जन्मल्यापासून वयाच्या वाविसाव्या वर्षांपर्यंत घरात जेवतोय पण आपल्याला कधी जेवण नको वाटावे, इतका कधी तिटकारा कधीच आला नाही मग बाहेरच्या पदार्थांबाबत असे का घडत असावे?


आजच्या काळात जेवण तुम्ही म्हणाल तिथे पोहोचवणारे ‘स्विगी’, ‘झोमॅटो’ सारख्यांची संख्या वाढत आहे. अगदी वरण-भात, भाजी पोळीपासून पिझ्झा - बर्गरपर्यंत सर्व आपल्या दारात गरम गरम आणून पोहोचवले जाते. ‘आईचे हॉटेल’, ‘आजीचा तडका’, ‘मम्माज कॅण्टीन’, ‘मॉ की रसोई’, ‘मायचा चुल्हा’ अशा नावाने अगदी आपल्या भावनांना हात घालत जाहिरात केली जाते आणि आपण तिकडून पदार्थ मागून खात राहतो.


लग्न समारंभ इत्यादी मोठे कार्यक्रम असोत; परंतु छोटे छोटे घरगुती कार्यक्रम जसे की बारसे, वाढदिवस, संक्रांत, दिवाळी-ईद-क्रिसमस, नातेवाइकांचे गेट-टुगेदर, प्रमोशन पार्टी, वास्तुशांत या सगळ्या कार्यक्रमांना बाहेरूनच घरी पदार्थ मागवले जातात किंवा हे सण बाहेरच हॉल घेऊन वगैरे केले जातात. आता तर चार-पाच माणसांच्यावर स्वयंपाक करणे बहुतांश घरात स्त्रियांना जमत नाही.


या पार्श्वभूमीवर मामीच्या हातच्या पुरणपोळ्या, काकूच्या हातचे गुलाबजाम, वहिनीच्या हातचे ताकातले पिठले, आजीच्या हातच्या पोळ्या, जाऊच्या हातची कोशिंबीर, शेजारच्या सपनाच्या हातचा रवा ढोकळा, सविता भाभीच्या हातचा कुरकुरीत डोसा हे पदार्थ कधीतरी आठवत राहतात. नातेवाइकांकडे जाणे कमी झाले आणि शेजार-पाजाऱ्यांचीही दारं ठोठावून काही देणे-घेणे जवळजवळ बंद झाले. अशा पार्श्वभूमीवर कोणाच्या हातचं खाणं फक्त आठवणी आपल्या हातात राहिलेलं आहे. म्हणूनच मला सांगावेसे वाटते की घरचे जेवण हे घरचेच असते.


स्वच्छतेची काळजी घेऊन, आरोग्याचा विचार करून, कष्टपूर्वक, प्रचंड प्रमाणात प्रेम ओतून घरच्यांनी ते घरच्यांसाठी बनवलेले असते. त्या अन्नाचा आदर करा आणि कधीतरी जो ते अन्न शिजवतो, प्रेमाने वाढतो त्याला त्याच्या जिवंतपणीच खाताना हे सांगायला विसरू नका की, तुझ्या हातच्या या पदार्थाची चव अप्रतिम आहे! आपले जेवण झाल्यावर न जेवताही त्या माणसाचे समाधानाने पोट भरते. ते तर आपण प्रत्येक जण निश्चितपणे करू शकतो!
pratibha.saraph@ gmail.com

Comments
Add Comment