नवी दिल्ली: उपराष्ट्रपती पदासाठी आज एनडीएच्या उमेदवाराची दिल्लीत घोषणा होण्याची शक्यता आहे. संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू असतानाच जगदीप धनखड यांनी उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिला होता. त्यांनी दिलेल्या राजीनाम्यानंतर नवे उपराष्ट्रपती कोण होणार? याकडे अनेकांच्या नजरा लागलेल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर दिल्लीत घडामोडींना वेग आल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान उपराष्ट्रपती पदासाठी काही नावांची मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे.
उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने ९ सप्टेंबरची तारीख जाहीर केली आहे. या अनुषंगाने भारतीय जनता पक्षाच्या संसदीय मंडळाची आज एक महत्वाची बैठक होणार आहे. या बैठकीत उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी एनडीएचा उमेदवार निश्चित करण्यात येणार असल्याची चर्चा आहे. असे असले तरी, भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (एनडीए) पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचे अध्यक्ष जे.पी. नड्डा यांना एनडीएचा उमेदवार निवडण्याचे अधिकार दिल्याचं बोललं जात आहे.
उपराष्ट्रपती पदासाठी मोठ्या नावांची चर्चा
एनडीटीव्हीने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या एका वृत्तानुसार, गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत, कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत, सिक्कीमचे राज्यपाल ओम माथूर आणि जम्मू आणि काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांच्या नावांची जोरदार चर्चा आहे. तसेच आगामी बिहार निवडणुका लक्षात घेऊन राज्यसभेचे विद्यमान उपसभापती हरिवंश यांचाही विचार केला जाऊ शकतो.
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीच जगदीप धनखड यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. धनखड यांनी प्रकृतीच्या कारणास्तव राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे.