
नांदेड: तहसीलदार प्रशांत थोरात नांदेड जिल्ह्यातील उमरी येथे कार्यरत होते. गेल्या महिन्यात त्यांची बदली लातूर जिल्ह्यातील रेणापूर येथे करण्यात आल्यानंतर ३० जुलै रोजी ते उमरी येथून कार्यमुक्त झाले होते. यादरम्यान त्यांचा ८ ऑगस्ट रोजी उमरी येथील तहसीलदार कार्यालयात निरोप समारंभ पार पडला. ज्यात त्यांनी तहसीलदाऱ्याच्या अधिकृत खुर्चीत बसून गाणे सादर केले. या प्रसंगाचा व्हीडीओ नंतर सोशल मीडियावर प्रदर्शित झाल्यावर, त्यावर सामान्य नागरिक व राजकीय कार्यकर्त्यांकडून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त झाल्या.
कारण या व्हिडिओमध्ये थोरात विविध अंगविक्षेप व हातवारे करताना दिसून आले. त्यांचे वर्तन हे एका जबाबदार शासकीय अधिकाऱ्यास अजिबात शोभणारे नाही, असे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले आहे. या प्रकारामुळे शासन व प्रशासनाची प्रतिमा मलिन झाली असून, ही बाब अत्यंत गंभीर आहे. जिल्हाधिकारी, नांदेड यांनी यासंदर्भात सादर केलेल्या अहवालाच्या अनुषंगाने प्रशांत थोरात यांना तत्काळ निलंबित करण्यात आले. या कारवाईमुळे महसूल खात्यात एकच खळबळ उडाली आहे.
अहवालात काय म्हंटले?
थोरातांच्या गायनाचा प्रकार निदर्शनास आल्यानंतर नांदेडच्या जिल्हाधिकार्यांनी विभागीय आयुक्तांकडे अहवाल पाठविला होता. अंगविक्षेप व हातवारे करून थोरात यांनी शासकीय कर्मचार्याला अशोभनीय ठरेल, असे वर्तन केल्याचे अहवालात नमूद करण्यात आले होते. त्यांची ही कृती बेजबाबदार ठरवून महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम १९७९च्या कलम ४ (१) नुसार त्यांना विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी निलंबित केले. उमरीहून कार्यमुक्त झाल्यानंतर ते रेणापूर येथे रुजूही झाले होते.
प्रत्येक शासकीय अधिकाऱ्याने आपण त्या खुर्चीत असताना पदाची गरिमा, वेळ, स्थळ आणि संदर्भ याचे भान ठेवणे आवश्यक आहे. शासकीय पदावर कार्यरत असताना त्या पदाच्या जबाबदाऱ्या, मर्यादा व प्रतिष्ठा जपणे ही प्रत्येक अधिकाऱ्याची प्राथमिक जबाबदारी आहे. कौटुंबिक किंवा खासगी समारंभात अशा सादरीकरणास मुभा असली तरी शासकीय व्यासपीठावर वर्तवणुकीची मर्यादा पाळणे अपेक्षित आहे.
निलंबन कालावधीमध्ये प्रशांत थोरात यांचे मुख्यालय धाराशिव राहील, असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले असून तेथील जिल्हाधिकार्यांच्या पूर्वसंमतीशिवाय मुख्यालय सोडू नये असे त्यांना बजावण्यात आले आहे.