Sunday, August 17, 2025

ब्रह्मदेव सृष्टीचे रचनाकार

ब्रह्मदेव सृष्टीचे रचनाकार

महाभारतातील मोतीकण: भालचंद्र ठोंबरे


ब्रह्मदेवाने आपल्या छायेपासून तम, मोह, तामिस्त्र, महामोह, अंधतामिश्र अशा पाच प्रकारच्या अविद्या निर्माण केल्या; परंतु आपले हे तमोगुणी शरीर ब्रह्मदेवांना योग्य वाटले नाही, म्हणून ब्रह्मदेवाने या तमोगुणरूपी शरीरांचा त्याग केला. त्यामुळे रात्ररूपी शरीर निर्माण झाले. त्या शरीरातून दोन जीव निर्माण झाले. त्यांनी त्या रात्ररूपी शरीरालाच खाऊन टाकले. त्यावेळी त्यांना तहान-भूक लागल्याने ते ब्रह्मदेवांनाच खायला उठले. याला ठेवू नका खाऊन टाका असे म्हणू लागले ते यक्ष झाले आणि ठेवू नका असे जे म्हणाले ते राक्षस झाले. ब्रह्मदेवाने त्यांना अरे यक्ष, राक्षसांनो ! तुम्ही माझी संतान आहात म्हणून माझे भक्षण नाही रक्षण करा असे सांगितले. नंतर ब्रह्मदेवांनी सत्वगुणांच्या प्रभावाने प्रमुख देव देवतांची निर्मिती केली. ब्रह्मदेवाने आपल्या नितंबापासून कामासक्त असुरांना निर्माण केले. ते कामाधुंद असल्याने मैथुनासाठी ब्रह्मदेवांच्याच मागे लागले. तेव्हा ब्रह्मदेव भयभीत होऊन श्रीहरींकडे गेले व म्हणाले हे परमात्मा, आपल्या आज्ञेनेच मी प्रजा उत्पन्न केली; परंतु ती तर पापी प्रजा माझ्याशीच मैथुनाला प्रवृत्त झाली आहे. तेव्हा भगवान श्रीहरी म्हणाले तू आपल्या या कामकलुषित शरीराचा त्याग कर. तेव्हा ब्रह्मदेवांनी आपल्या शरीराचा त्याग केला. त्या त्यागलेल्या शरीराचे रूपांतर एका सुंदर स्त्रीमध्ये झाले. तिचे नाव संध्यादेवी. मधुधूंद दैत्यांनी त्या संध्यादेवीचे ग्रहण केले.


नंतर ब्रह्मदेवांनी आपल्या शरीरापासून गंधर्व व अप्सरा निर्माण करून आपल्या शरीराचा त्याग केला. त्या त्यागलेल्या शरीराला विश्वावसू आदी गंधर्वांनी ग्रहण केले. ब्रह्मदेवांनी आपल्या आळसापासून भूत-पिशाच्च निर्माण केले. त्यांचे वस्त्रहीन स्वरूप व विस्कटलेले केस पाहून ब्रह्मदेवांनी आपले डोळे मिटले व शरीराचा त्याग केला. त्या त्यागलेल्या शरीराला भूत पिशाच्यांनी ग्रहण केले त्याला निद्रा म्हणतात. जिच्यामुळे शरीराच्या इंद्रियांना शिथिलता येते. उष्ट्या तोंडाने मनुष्य झोपल्यास भूतपिशाच्यांचे त्यावर आक्रमण करतात त्याला उन्माद म्हणतात.


त्यानंतर ब्रह्मदेवांनी स्वत: बलवान असल्याची भावना करून अदृश्य रुपाने साध्यगण व पितृगणांना उत्पन्न केले. याच पितरांना कर्मकांड करणारे लोक पिंड आणि साध्यगणांना हव्य अर्पण करतात. ब्रह्मदेवाने आपल्या तिरोधान शक्तीने सिद्ध व विद्याधराची सृष्टी निर्माण केली. एक वेळ त्यांनी आपले प्रतिबिंब पाहिले. तेव्हा आपल्याला सुंदर मानून त्यांनी प्रतिबिंबापासून किन्नर व किंपुरुष निर्माण केले.
एकदा ब्रह्मदेवांना कृतकृत्य झाल्याचा अनुभव आला त्यावेळी त्यांनी १४ मनूंची निर्मिती केली. ते सर्वजण प्रजावृद्धी करणारे ठरले. त्यांना पाहून आधी उत्पन्न झालेले देव व गंधर्व यांनी ब्रह्मदेवाची स्तुती केली. आपली ही सृष्टी सुंदर असून यात अग्निहोत्रादि कर्मे प्रतिष्ठित आहेत. त्यांच्या साहाय्यानेच आम्ही आमचे अन्नग्रहण करू शकू असा आशावाद व्यक्त केला. नंतर ब्रह्मदेवांनी इंद्रिय संयम, तप, विद्या, योग आणि समाधीने संपन्न होऊन प्रिय अशा ऋषी गणांची निर्मिती केली. त्या प्रत्येकाला आपल्या समाधी योग विद्या व वैराग्यमय शरीराचा अंश दिला.


ब्रह्मदेवाच्या शरीरातून उत्पन्न झालेला प्रथम महाराज स्वायंभूव मनू व महाराणी शतरूपा आपली कन्या देवहूतीसह एकदा कर्दम ऋषींच्या आश्रमात आले. कर्दमाने त्यांचे आदरातिथ्य करून आशीर्वाद दिले. महाराजा स्वायंभूव मनूनीही कर्दमाची स्तुती करून आपल्या कन्येला आपल्याशी विवाह करण्याची इच्छा असल्याचा मनोदय व्यक्त केला. कर्दमानी मात्र अपत्य प्राप्तीनंतर आपण पुन्हा संन्यासप्रधान व तपादी धर्मांना प्राधान्य देऊ या अटीवरच विवाह करण्याचे मान्य केले. देवहूतीला अट मान्य असल्याने स्वायंभूव मनूने दोघांचा विवाह थाटामाटात लावून दिला आणि त्यांचे पुढील आयुष्य त्यांनी भगवंताच्या कथा, ध्यान, रचना व निरूपणात घालवून त्यांनी आपले ७१ चतुर्युग पूर्ण केले.


कर्दम ऋषी व देवहुती यांना कला, अनुसया, श्रद्धा, हविर्भू, गती, साध्वी, स्वाती, अरुंधती, शांती अशा नऊ कन्या झाल्या. सर्व मुली सुस्वरूप व सद्गुणी होत्या. कर्दमानी देवहूतीला संयम, तप, नियम, द्रव्य, दान करून भगवंताचे स्मरण करण्याचा सल्ला दिला व प्रत्यक्ष श्रीहरीच तुझ्या पोटी येतील असा आशीर्वाद दिला. त्याप्रमाणे आचरण केल्यानंतर उचित कालावधीनंतर देवहूतीच्या पोटी पुत्र जन्मला. त्याचवेळी ब्रह्मदेवाने प्रकट होऊन कर्दमांना आपल्या नऊ कन्या मरीच वगैरे मूनीवरांना त्यांच्या स्वभाव व आवडीनुसार देण्यास सांगितले. तसेच तुझ्या पोटी प्रत्यक्ष श्री नारायणांनी संख्याशास्त्राचा उपदेश करण्यासाठीच जन्म घेतला आहे व ते कपिल या नावाने प्रसिद्ध होतील असा आशीर्वाद दिला. ब्रह्मदेवांच्या आज्ञेने कर्दमांनी आपल्या कन्या अनुक्रमे कला मरीचिला, अनुसया अत्रीला, श्रद्धा अंगीकाराला, हविर्भू पुलस्त्यला, गती पूलहाला, साध्वी कृतीला, ख्याती भृगुला, अरुंधती वशिष्ठला आणि शांती अथर्व ऋषीला दिली.


पुत्ररूपाने आलेल्या भगवान परब्रम्हाला नमन करून व आपण पुत्ररूपाने अवतरल्यामुळे मी धन्य झालो. माझे सर्व मनोरथच पूर्ण झाल्याने मी आता संन्यास आश्रम ग्रहण करीन व आपल्या चिंतनात उर्वरित आयुष्य घालवेन असे म्हणून कर्दम यांनी कपिलरूपी या बाल भगवंताची आज्ञा घेतली व श्री भगवद्भक्तीने संपन्न होऊन भगवंताचे परंपद प्राप्त केले.


Comments
Add Comment