Sunday, August 17, 2025

झेप सूर्याकडे

झेप सूर्याकडे

ओंजळ : पल्लवी अष्टेकर


तामिळनाडूच्या एका लहानशा गावात एक छोटी मुलगी आपल्या घराच्या अंगणात आकाशाकडे टक लावून पाहत बसायची. तिला आकाशात चमचमणाऱ्या ताऱ्यांमध्ये काहीतरी गूढ भासत असे, जणू काही ते तिला बोलावत असावेत. तिच्या डोक्यात अनेक प्रश्न यायचे - हे तारे का चमकतात? अंतराळ किती मोठं आहे? मानव अंतराळात जाऊ शकतो का? आणि या सर्व प्रश्नांची उत्तरं तिला मिळायची तिच्या वडिलांकडून.


तिचे वडील, शेख मीरान, एक गणितज्ज्ञ होते, पण त्यांनी शेतीकडे आपला व्यवसाय म्हणून पाहिलं होतं. जरी त्यांचं रोजचं काम शेतात असे, तरी त्यांचं मन कायम विज्ञानाच्या दुनियेत रमलेलं असायचं. त्यांना विज्ञान आणि गणिताची अपार आवड होती आणि त्यांनी आपल्या मुलीलाही त्या प्रेमात ओढून घेतलं. रोज रात्री, जेवण झाल्यावर, ते तिला मोठमोठ्या शास्त्रज्ञांच्या कथा सांगायचे. “मॅडम क्युरी माहिती आहेत का, बेटा?” ते विचारायचे आणि मग ते मेरी क्युरीच्या धैर्याची, तिच्या शोधाची आणि तिच्या संघर्षाची कहाणी सांगायचे, “ती पहिली महिला होती जिने नोबेल पारितोषिक जिंकले! आणि फक्त एकदा नाही, दोनदा!” त्यांच्या डोळ्यांत कौतुकाची चमक असे. त्यांच्या या कहाण्या फक्त कथा नव्हत्या, तर त्या त्यांच्या मुलीच्या मनावर खोल परिणाम करणाऱ्या शिकवण्या होत्या. त्या मुलीला हळूहळू समजू लागलं की, विज्ञान हा केवळ एक विषय नाही, तर तो एक प्रवास आहे- नवीन गोष्टी शोधण्याचा, अज्ञाताला जाणून घेण्याचा आणि जग बदलण्याचा.



बालपण आणि शिक्षण 


निगारचा जन्म १९६४ मध्ये तामिळनाडूच्या ‘तेनकासी’ जिल्ह्यातील ‘सेंगोट्टई’ येथे झाला. तिच्या कुटुंबाने शिक्षणाला मोठे महत्त्व दिले. तिची आई, ‘सैतून बीवी’- गृहिणी होत्या. तिने शालेय जीवनात उल्लेखनीय प्रगती केली. तिने सेंगोट्टईच्या एसआरएम सरकारी मुलींच्या उच्च माध्यमिक विद्यालयात शिक्षण घेतले. निगार १० वीच्या परीक्षेत जिल्ह्यात प्रथम आली आणि १२ वीमध्ये काॅलेजची अव्वल विद्यार्थीनी ठरली. तिच्या शिक्षकांनी आणि कुटुंबाने तिला अभियांत्रिकी क्षेत्रात जाण्यासाठी प्रोत्साहन दिले. तिने मदुराई कामराज विद्यापीठाच्या अंतर्गत असलेल्या तिरुनेलवेली येथील गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगमधून इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन इंजिनीअरिंगमध्ये पदवी घेतली. त्यानंतर तिने बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, मेसरा येथून इलेक्ट्रॉनिक्समध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले, ज्यामुळे तिचे अभियांत्रिकी आणि अंतराळ तंत्रज्ञान क्षेत्रातील कौशल्य अधिक विकसित झाले.



इस्रोमधील कारकीर्द


१९८७ मध्ये, डाॅ. निगार यांनी भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) मध्ये काम करण्यास सुरुवात केली आणि त्यांचा पहिला कार्यकाळ बंगळूरु येथील यू आर राव सॅटेलाइट सेंटरमध्ये होता. त्यांच्या ३० हून अधिक वर्षांच्या कारकिर्दीत, त्यांनी दूरसंवेदन आणि संप्रेषण उपग्रह प्रकल्पांमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले. २०१६ मध्ये प्रक्षेपित झालेल्या रिसोर्ससॅट-२ ए या दूरसंवेदन उपग्रहाच्या सहाय्यक प्रकल्प संचालिका म्हणून त्यांनी काम पाहिले. उपग्रह विकास आणि अवकाश तंत्रज्ञान क्षेत्रातील त्यांचे योगदान भारताच्या पृथ्वी निरीक्षण आणि संप्रेषण तंत्रज्ञानाच्या प्रगतीसाठी महत्त्वपूर्ण ठरले आहे.



आदित्य - एल १ : भारताचे पहिले सौर वेधशाळा अभियान


डॉ. निगार यांना त्यांच्या कारकिर्दीत एक नवीन मैलाचा टप्पा गाठण्याची संधी मिळाली, जेव्हा त्यांची आदित्य-एल १ या भारताच्या पहिल्या सौर अभियानाच्या प्रकल्प संचालिका म्हणून निवड झाली. २ सप्टेंबर २०२३ रोजी श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अवकाश केंद्रातून हे यान, PSLV-C57 रॉकेटद्वारे यशस्वीपणे प्रक्षेपित करण्यात आले. हा भारताच्या अवकाश संशोधन इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा होता.



मोहिमेचा आढावा


आदित्य - एल १ चा मुख्य उद्देश सूर्याच्या वातावरणाचा अभ्यास करणे, विशेषतः त्याच्या क्रोमोस्फिअर आणि कोरोना स्तरांची माहिती मिळवणे हा होता. यामुळे सौर क्रियाकलाप आणि त्यांच्या अंतराळ हवामानावर होणाऱ्या परिणामांबद्दल अधिक माहिती मिळू शकणार होती. प्रक्षेपणानंतर ६३ मिनिटांनी उपग्रह पृथ्वीच्या कक्षेत यशस्वीरीत्या स्थापित करण्यात आला. नंतर त्याच्या पृथ्वीभोवती काही कक्षा पार पडल्यानंतर, ते सूर्य-पृथ्वी लाग्रांज पॉइंट १ (एल १) कडे रवाना झाले, जे पृथ्वीपासून सुमारे १५ लाख किलोमीटर अंतरावर आहे. ६ जानेवारी २०२४ रोजी, हे यान एल १ बिंदूवर पोहोचले आणि तिथे एका हेलो कक्षेत स्थापित करण्यात आले.



 वैज्ञानिक उद्दिष्टे


आदित्य - एल १ मोहिमेची मुख्य उद्दिष्टे खालीलप्रमाणे होती :




  • सूर्याच्या क्रोमोस्फिअर आणि कोरोनाचे निरीक्षण करणे.

  • क्रोमोस्फिअरिक आणि कोरोनाच्या तापमान वाढीचा अभ्यास करणे.

  • सौर वारा आणि कोरोनल मास इजेक्शन (CMEs) यांचा अभ्यास करणे.

  • आंशिकपणे ionized plazma भौतिकशास्त्राचे विश्लेषण करणे.

  • अवकाश हवामानावर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करणे.


फेब्रुवारी २०२४ मध्ये, आदित्य-एल१ ने एक शक्तिशाली सौर ज्वाला निरीक्षित केली, ज्यामुळे वैज्ञानिकांना अशा सौर घटना आणि त्यांचा पृथ्वीच्या वातावरणावर होणाऱ्या परिणामांचा अधिक अभ्यास करण्यास


मदत झाली.



वैयक्तिक जीवन आणि वारसा


डॉ. निगार शाजी यांचे पती शहाजहान हे अभियंता आहेत आणि त्यांचा मुलगा तारीक हा देखील एक वैज्ञानिक आहे. त्यांचे संपूर्ण कुटुंब सध्या बंगळूरुमध्ये राहते. त्यांचा प्रवास एका लहानशा गावातून सुरू होऊन भारताच्या सर्वात महत्त्वाच्या अंतराळ मोहिमेच्या नेतृत्वापर्यंत पोहोचला आहे. त्यांचे कार्य आणि योगदान विज्ञान आणि अंतराळ संशोधन क्षेत्रात नवोदित संशोधकांसाठी, विशेषतः महिलांसाठी, प्रेरणादायी आहे. त्यांचा प्रवास हे सिद्ध करतो की प्रबळ इच्छाशक्ती आणि समर्पण असेल तर आकाश म्हणजे केवळ सुरुवात आहे - शेवट नाही.


Comments
Add Comment