
सांगली: सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील उरुण इस्लामपूर शहराचे नाव 'ईश्वरपूर' करण्याची घोषणा शासनाने यंदाच्या पावसाळी अधिवेशनात केली आहे. याबाबतचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे मान्यतेसाठीही पाठविण्यात आला आहे. मात्र नामकरणाच्या या प्रस्तावात 'उरुण' हा शब्द वगळलेला आहे. त्यामुळे इस्लामपूरच्या नव्या नावात उरूणचा देखील समावेश व्हावा यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी आज राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांची राजभवन येथे शिष्टमंडळासह भेट घेतली. या दरम्यान त्यांनी राज्यपालांना निवेदनही दिले आहे. जयंत पाटील यांनी आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून याबाबत माहिती दिली आहे.
यात ते म्हणाले की, उरुण हा ऐतिहासिक परंपरा असलेला भाग आहे. इसवी सनाच्या दुसऱ्या शतकापासून याचा उल्लेख आढळतो. तर सोळाव्या शतकानंतर इस्लामपूरचा उल्लेख आढळतो. यामुळे या शहराला "उरुण-इस्लामपूर" अशीच ओळख असून शहराने सामाजिक सलोखा जपला आहे. त्यामुळे राज्य शासनाने प्रस्तावित केल्याप्रमाणे केंद्र सरकारने प्रस्ताव मंजूर केला तर "उरुणचे" अस्तित्वच नष्ट होईल. त्यामुळे, रुण इस्लामपूर' शहराच्या नामांतराच्या प्रस्तावात उरुण नावाचा समावेश करुन प्रस्ताव केंद्र सरकारला पाठवण्याची विनंती त्यांनी या निवेदनामार्फत केली आहे.
इस्लामपूरच्या नामांतरात उरुण चा समावेश उरूण वासीयांचे साखळी उपोषण
इस्लामपूरच्या ईश्वरपूर या नव्या नामांकरणात उरूण चा समावेश व्हावा ही उरूण वासियांची आग्रहाची मागणी असून त्यासाठी ते दिनांक १ ऑगस्ट, २०२५ पासून साखळी उपोषण करीत आहेत. मात्र अद्याप राज्य मंत्रीमंडळाने याबाबत कोणताही निर्णय घेतला नसल्यामुळे, मुख्यमंत्र्यांना याविषयी सूचना करण्याबद्दल राज्यपालांना निवेदनाद्वारे सांगण्यात आले आहे.