नक्षत्रांचे देणे : डॉ. विजया वाड
आम्ही उदयाचलने सामने बघत होतो. मी माझ्या छोट्या मैत्रिणीला बरोबर घेऊन गेले होते. हिरामणी वाधवा. दृष्टिहीनांना नवदृष्टी देणारी बहाद्दर मुलगी. सामन्याचे वर्णन ती करीत होती. आमच्यासोबत एक पंजाबी शिक्षिका होती. ती आश्चर्याने म्हणाली. तुम तो कुछ भी देख नही सकती. फिर यह वर्णन कैसे? यावर हिरामणी न रागवता म्हणाली, आपके पास केवल दो आँखे है. मेरा यह दस ऊँगलिया मेरी दस आँखे है | और एक मेरा अंत:चक्षू. ऐसी ११ आँखे है मेरे पास! आपको है पता? ती गप्प झाली. अंतर्मुख झाली. नव्या दृष्टीने, ममतेने हिरामणीकडे बघू लागली. हिरामणी ऐसी ही बहाद्दर सखी है हमारी !
हिरामणी वाधवा ९ महिन्यांची असताना ताप आला आणि त्यात डोळे गेले. छबिलदास गर्ल्स हायस्कूल, दादर स्कूल फॉर द ब्लाईंड, येवढंच नाही, खालसा कॉलेज आणि निर्मला निकेतन कॉलेज ऑफ सोशल वर्क येथे एम.एस. डब्ल्यू-मास्टर ऑफ सोशल वर्क ही पदवी उच्च गुणांनी पास केली. महानगरपालिकेत ३९ वर्षे यशस्वीरीत्या कार्य केले. ७९-८० ची वेळ. मी आणि ठाण्याच्या लीला जोशी ‘उंच माणसांचे बेट’ हे पुस्तक लिहीत होतो. त्यावेळेस हिरामणी वाधवा ही मुलगी मला भेटली आणि तिच्या व्यक्तिमत्त्वाने मी भारावून गेले.
आपली काठी घेऊन ही बहाद्दर मुलगी जग हिंडली आहे. सारे जग तिने अत:चक्षूंनी पाहिले आहे. एवढेच नव्हे तर एम. एस. डब्ल्यूपर्यंतचे शिक्षण उच्च गुणांनी पास केले आहे. नोकरी करता करता आणखी शिक्षण चालू होते. तेही उच्च गुणांसह पास झाले. लोकल सेल्फ गर्व्हमेंट सर्विस, एलएल. बी, नीलम कांगा अॅवाॅर्ड, झाशीची राणी अॅवाॅर्ड अशी खूपशी बक्षिसे मिळाली, २९ वर्षे बीएमसी आणि ११ वर्षे लोकल सेल्फ गव्हर्मेंट, म्युनिसिपालिटी आणि विविध ठिकाणी आनंदाने नोकरी केली. खूप आवडीने सारी कामे केली. मंगलोर, चेन्नई, उत्तर प्रदेश, पंजाब, दिल्ली, जगन्नाथपुरी किती ठिकाणी ती हिंडली, अनुभव संपन्न झाली. मोठे मोठे अपघात झाले. फ्रॅक्चर झाले. पण दैव बलवत्तर. साऱ्या साऱ्या उपचारांची पूर्तता झाली. डॉक्टर म्हणाले, ऑपरेशन करावे लागेल, पण वाचले. २०१९ मध्ये रुग्णालयात ६ जुलै इस्पितळात प्रवेश केला. इस्पितळातून भावाने दिलेल्या नव्या घरात प्रवेश झाला. माझी भावंडे चंदन, प्रवीण सारा मेटेनन्स बघतात. खूप पैसे माझ्यावर खर्च करतात. नरेशही खूप खर्च करतो. आयुष्यात वाईट अनुभवही आले. ट्रेनमध्ये तरुणपणी खूप प्रवास केला. पण काही प्रवासी दुष्ट प्रवृत्तीचे होते, त्यांना समजावले. एक
हिरामणीने आयुष्य सुधारले. एका तरुणाला नर्स म्हणजे काय तेच ठाऊक नव्हते. त्याला ती किती सेवाभावी असते, कोणकोणती कामे करते, ते समजावून सांगितले आणि त्याचा संभ्रम दूर केला. त्यांची प्रॅक्टिकल्स करून दाखविली मग तेव्हा समजले त्याला, नर्स म्हणजे सामान्य प्राणी नव्हे. तो एक सेवाभावी जीव आहे.
‘कधी लग्न करावे असे वाटले का?’ नाही वाटले? ती स्वच्छपणे म्हणाली. काही व्यक्तींनी विचारले होते. डोळस नि अंध व्यक्तीही त्यात होत्या. पण मला माझे स्वातंत्र्य अबाधित ठेवायचे होते. मनाप्रमाणे जगायचे होते. मग मी अगदी स्वेच्छेने अविवाहित राहायचे ठरवले. त्याचे मला अजिबात दु:ख होत नाही. मी पेन्शनर आहे. आयुष्यभर काम केले आहे. “मला थकायला, दमायला होत नाही. उलट समाधान मिळते. आपण कोणाच्या तरी आयुष्यात आनंद निर्माण करू शकतो, हेच ते समाधान नि हाच तो आनंद !” ती सांगते.
हिरामणी वाधवा आपल्या दु:खद अनुभवांवर बोलत नाही. ते मनावेगळे करण्यात ती यशस्वी ठरली आहे. हा आयुष्याचा मोठा फंडा आहे असे मला वाटते. कारण दु:ख कुरवाळण्याने दु:ख वाढते. सुखाचा फंडा बाजूला पडतो. सुखी आयुष्याचे हेच रहस्य आहे आणि ते हिरामणी वाधवाला बरोबर ज्ञात आहे.
हिरामणी वाधवा हिने कितीतरी संसार सुखाचे केले आहेत. त्यात ती खूप समाधान मानते. हिरामणी या नावातच हिरा आहे. नाव मोठे अर्थपूर्ण आहे. तिने खूप अर्थपूर्ण जगावे, इतर लोकांच्या आयुष्यात सुख वाटावे असे अगदी मनापासून वाटते. हिरामणी, तुला खूप आयुष्य लाभो हीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना. खूप सुखी आयुष्य जग. खूप लोकांना सुखाची साखर वाटत राहा आणि स्वत: आनंदी राहा.
एखादे घर आनंदाने तोरण लागून मंगल मंगल होते. मग त्या घरातून आनंदाची गाणी जन्म घेतात. त्या आनंदगीतांनी अवघे वातावरण मंगलमय होते. तुझ्या सहवासात ही मंगलता अशीच पसरो; ही ईश्वर चरणी मंगलमय प्रार्थना.
सुखाचे तोरण, लागो तुझ्या द्वारी
मंगल तोरण, कडेकपारी
सुखाचेच अवघे, आयुष्य असावे,
मंगल, मंगल, मांगल्य सजावे.
सदा राहो तुझ्या, द्वारात तू झिंया
मंगलकामना मनात माझिया.