Sunday, August 17, 2025

राज्यात मुसळधार पावसाने सहा जणांचा बळी, पुण्यासाठी रेड अलर्ट

राज्यात मुसळधार पावसाने सहा जणांचा बळी, पुण्यासाठी रेड अलर्ट

मुंबई : राज्यात सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पावसाने थैमान घातले असून विविध दुर्घटनांत सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये विदर्भात चौघांचा बळी गेला असून मराठवाड्यात भिंत पडून दोघांचा मृत्यू झाला आहे. हवामान विभागाने पुण्यासाठी रेड अलर्ट तर मुंबईसह कोकण-विदर्भातील अनेक जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करून जोरदार पावसाचा इशारा दिला आहे.अनेक ठिकाणी घरांची पडझड, शेतीमालाचे नुकसान तसेच पशुधनही दगावले आहे.



हवामान विभागाचा इशारा


हवामान विभागाने पुणे जिल्ह्यासाठी रेड अलर्ट तर मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर तसेच यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली या विदर्भातील जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तर मुंबई, रायगड, रत्नागिरी, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांमध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे.



विदर्भ व मराठवाड्यात पाऊसचा जोर


विदर्भातील अनेक जिल्ह्यांत पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. अमरावती, अकोला, वाशीम, बुलढाणा, भंडारा आदी जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी झाली. यामध्ये चार जणांचा बळी गेला असून दोन जण बेपत्ता आहेत व तीन जण जखमी झाले आहेत. मराठवाड्यात धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यात मांजरा नदीला आलेल्या पुरात एक शेतकरी वाहून गेला. तसेच भिंत पडून दोघांचा मृत्यू झाला आहे.



मुंबईत विक्रमी पाऊस


मुंबईत मागील २४ तासांत (शुक्रवारी सकाळी ८.३० ते शनिवारी सकाळी ८.३०) तब्बल 244.7 मिमी पावसाची नोंद झाली. हा मागील पाच वर्षांतील सर्वाधिक पाऊस आहे. यापूर्वी ऑगस्ट २०२० मध्ये २६८.६ मिमी पावसाची नोंद झाली होती.



समुद्र खवळलेला मच्छीमारांना इशारा


कोकण किनारपट्टीवर १७ ते २० ऑगस्टदरम्यान ५०-६० किमी/ताशी वेगाने वारे वाहणार आहेत. त्यामुळे मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा सल्ला हवामान विभागाने दिला आहे.



तलाव व धरणे ओसंडली


सांताक्रूझसह मुंबईत झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईकरांना पाणीपुरवठा करणारा तुळशी तलाव ओसंडून वाहू लागला आहे. तसेच मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांमधील पाणीसाठा ९०% वर पोहोचला असून मुंबईकरांचे पाण्याचे टेन्शन आटोपशीर झाले आहे.



मुंबईतील परिस्थिती


मुंबई आणि उपनगरांमध्ये पावसाचा जोर कायम असून अनेक सखल भागांत पाणी साचू लागले आहे. मात्र मुंबई महापालिका आणि पोलिस प्रशासन पूर्णपणे अलर्टवर असून नागरिकांना अत्यावश्यक कारणाशिवाय घराबाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


महाराष्ट्रात पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा इशारा असून प्रशासनाने सर्व नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.


Comments
Add Comment