
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात दोन दिवसांपासून मुसळधार पावसाचा जोर कायम असून नद्यांच्या पाणीपातळीत लक्षणीय वाढ झाली आहे. जिल्ह्यातील सर्व नद्या दुथडी भरून वाहत असून खेड, दापोली, चिपळूणला पावसाचा फटका बसला आहे. अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळित झाले आहे. हवामान विभागाने कोकण व मध्यम महाराष्ट्रासाठी १८ ऑगस्ट २०२५ पर्यंत अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.
चिपळूण शहर व परिसरात रात्रभर पाऊस कोसळला. रस्त्यांवर पाणी साचले असले तरी परिस्थिती नियंत्रणात आहे. वाशिष्ठी नदीची पाणी पातळी ४.५२ मीटर असून इशारा पातळी ५ मीटर आहे. पाणी घटत असल्याचे प्रशासनाने सांगितले. कोळकेवाडी धरणाची पाणी पातळी १३३.८५ मीटर असून पाणी कमी करण्यासाठी एक मशिन सुरू आहे.
जिल्ह्यात गेल्या २४ तासांत खेड तालुक्यात सर्वाधिक १७८.७१ मिमी पाऊस नोंदला गेला आहे. जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडून ७.२० मीटरवर पोहोचल्याने खेड शहरातील मच्छी मार्केट परिसरात पाणी शिरले आहे. नागरिक व व्यापाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नारिंगी नदीला आलेल्या पुरामुळे खेड-दापोली रस्त्यावर वाहतूक बंद करण्यात आली आहे.
दापोली तालुक्यातही मुसळधार पाऊस सुरू असून कांदिवलीतील दादर पुलावरून पाणी वाहत आहे. त्यामुळे वाहतूक बंद केली आहे. असोंड गावातील अंतर्गत रस्ता वाहून गेला आहे. संगमेश्वर तालुक्यातील माखजन बाजारपेठेत गडनदीच्या पुराचे पाणी दुसऱ्यांदा शिरले असून व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
चिपळूणचे प्रांताधिकारी आकाश लिगाडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पावसामुळे नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. परिस्थिती नियंत्रणात आहे. तरीदेखील गरज नसेल, तर घराबाहेर पडू नये. अत्यावश्यक कामाशिवाय नागरिकांनी बाहेर जाणे टाळावे. प्रशासनाकडून सर्व अपडेट्स दर अर्ध्या तासाला देण्यात येतील.
चिपळूण शहरातील काही ठिकाणी पावसाचे पाणी रस्त्यावर साचले असून, पालिका कर्मचारी सतत पाणी उपसण्याचे व वाहतूक सुरळीत ठेवण्याचे प्रयत्न करत आहेत. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता केवळ अधिकृत माहितीकडे लक्ष द्यावे, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
गेल्या २४ तासांत रत्नागिरी जिल्ह्यात सरासरी ८३.३३ मिमी पावसाची नोंद झाली. खेडमध्ये सर्वाधिक पाऊस तर चिपळूण व दापोलीत प्रत्येकी १२५ मिमी, मंडणगडमध्ये ११६ मिमी पावसाची नोंद झाली आहे.