Sunday, September 7, 2025

हत्ती

हत्ती

कथा : रमेश तांबे

एक होता हत्ती त्याच्या अंगात फार मस्ती इकडे तिकडे धावायचा पायाखाली येईल त्याला चिरडायचा. हत्ती तरुण होता रुबाबदार देखणा होता सुपासारखे कान हलवायचा रानात वेगात पळायचा पांढरे शुभ्र होते त्याचे सुळे बघून त्याला जो तो पळे.

वयस्क हत्ती त्याला सांगायचे अरे पोरा नको करू मस्ती कशाला करतो उगाचच कुस्ती. आपण पडलो हत्ती खरे आपले चालणे शांतच बरे पायाखाली किती मरतात किती जण तुला घाबरतात पण हत्ती त्यांना हसायचा नको नको ते बोलायचा तुम्ही बसा घरात नका काढू तुमची वरात मी एकटाच चाललो देतो एका एकाला फटका.

मग काय हत्ती निघाला रानात आज वेगळेच होते त्याच्या मनात रस्त्यात एक बिबळ्या भेटला त्याला दिला सोडेंने टोला गेंड्याच्या पोटाला सुळे टोचले हरणांच्या अंगावर पाणी उडवले पायाने मोडली दोन झाडे हत्ती येताच सारे घाबरले.

मग सगळ्यांनी केला वेगळा विचार हत्तीला शिकवायचा चांगला धडा पक्षी किलबिलले आम्हाला सांगा हरीण म्हणाले नका करू दंगा एकट्याने घ्यायचा नाही त्याच्याशी पंगा मग प्राणी, पक्षी जमले झाडाखाली सगळ्यांची खूप मोठी चर्चा झाली त्यात सर्वांनी मते मांडली सशाला वाटले झाली फत्ते पण सभेत निर्णय झालाच नाही हत्तीची दादागिरी संपलीच नाही.

मग सशानेच ठरवले आपणच काहीतरी करावे एक दिवस हत्ती झाडाखाली बसला होता सशाने त्याला दुरून बघितलं जवळ जायचं केलं धाडस सोबत घेतले हरणाचे पाडस दोघेही गेले हत्तीच्या जवळ अंगात एकटवले सगळे बळ ससा म्हणाला हत्ती दादा मी आणि पाडस आलो भेटायला जंगलातल्या गोष्टी सांगायला हत्तीने त्याचे कान टवकारले सोंडेने छोटे झाड भिरकावले हत्तीचे रूप बघून ससा घाबरला माफ करा दादा असं म्हणाला मग हत्ती सशाला म्हणाला काय विशेष आहे सांग मला तोच हरणीचे पाडस म्हणाले जंगलात माणसाने घर केले घरात त्याच्या आहे संदुक त्यात असते नेहमीच बंदूक तो बंदूक घेऊन जंगलात फिरतो वाघ, लांडगे, कोल्हे, ससे टिपतो काहींना सोडतो, तर काहींना भाजून खातो.

तो माणूस म्हणाला, रोज शिकार का करावी एकच शिकार सहा महिने पुरावी एखादा तरुण हत्ती हवा मग मिळेल मला रोज रोज मेवा.

हत्ती म्हणाला अरे जा रे मी नाही घाबरत माणसाला तोच घाबरून जाईल बघून माझ्या शरीराला तेवढ्यात बंदुकीचा बार सुटला आवाज ऐकून हत्ती घाबरला म्हणाला लपायला जागा हवी पाडसा मला तुझी मदत हवी.

मग दोघेही म्हणाले त्रास कोणाला देऊ नकोस उगाचच खोड्या काढू नकोस सगळे प्राणी आपलेच मित्र सुखी जीवनाचे हेच सूत्र हत्तीला समजले सारे काही हे जीवन एकट्याचे नाही ऐकायलाच हवे आपल्या मित्रांचे तरच जीवन जाईल सुखाचे मग हत्तीचे वर्तन सुधारले सर्वांना त्याने मित्र मानले माणसाचे काय सांगू दोनच दिवसांत तो घरी गेला आणि सारे जंगल सुखी झाले.

Comments
Add Comment