Sunday, August 17, 2025

दिवसा बघू नका सूर्याकडे ...

दिवसा बघू नका सूर्याकडे ...

कथा : प्रा. देवबा पाटील


आदित्य, सुभाष व आदित्यचे मित्र यांचा एक चांगला गट तयार झाला होता. सुभाष त्यांना दररोज मधल्या सुट्टीत सूर्याविषयी माहिती सांगत असायचा.
“सूर्य उगवताना आणि मावळताना लालतांबडा का दिसतो?” पिंटूने प्रश्न केला.


तो म्हणाला, “सकाळी सूर्योदयाच्या व संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी सूर्य हा क्षितीजाजवळ असतो. त्यामुळे सूर्यप्रकाशाचा मार्ग जास्त लांबीचा म्हणजे जास्त अंतराचा असतो. त्यामुळे सूर्यकिरणांना धूलिकणांच्या लांब व मोठ्या थरातून यावे लागते. यावेळी कमी तरंगलांबीच्या निळ्या व जांभळ्या रंगाच्या प्रकाशाचे जास्त प्रमाणात विकिरण होते. त्यामुळे निळ्या व जांभळ्या रंगाचा प्रकाश विखरून विखरून नाहीसा होतो आणि कमी विखुरलेला तांबडा रंग शिल्लक राहतो. म्हणून या दोन्हीवेळी आपल्याला
सूर्य तांबडा दिसतो. तांबड्यासूर्यामुळे आकाशालाही लालसर तांबडा रंग येतो.”
“दिवसा सूर्याकडे का बघू नये? ” अंतूने शंका काढली.


“अरे मित्रांनो” त्याने उत्तर देण्याआधीच आदित्यच बोलला, “सूर्य हा तेज:पूंज प्रकाशगोळा असल्याने या सूर्यकिरणांचे तेजसुद्धा खूप जास्त असते. दिवसा सूर्याच्या तीव्र उष्णतेमुळे दिवसा सूर्याचा प्रकाश हा अतिशय प्रखर म्हणजे तेजस्वी असतो. त्यामुळे दिवसा सूर्याकडे बघितल्यास एवढा तेजस्वी प्रकाश आपले डोळे सहन करू शकत नाहीत आणि आपले डोळे एकदम दीपतात व आपोआप मिटतात. तसेच दिवसा सूर्याकडे बघितल्यास आपल्या डोळ्यांना अंधत्व येण्याचा धोका
असतो म्हणून दिवसा सूर्याकडे
मुळीच बघू नये.”
“बरोब्बर दादा.” तो मुलगा म्हणाला, “दादा तुम्हालाही बरीच माहिती आहे.”
“माहिती तर सर्वांनाच आहे रे पण सर्वांची स्मरणशक्ती सारखी नाही गड्या.” मोंटू बोलला.
“बरे, सूर्य आपल्या डोक्यावर केव्हा असतो?” अंतूने प्रश्न केला.
तो मुलगा म्हणाला, “दररोज दुपारी १२ वाजता. पण आपण जरी दररोज दुपारी १२ वाजता म्हणतो की सूर्य डोक्यावर आला; परंतु तो तंतोतंत डोक्यावर नसून किंचितसा तिरपा असतो.


वर्षातून फक्त दोनदाच सूर्य तंतोतंत आपल्या डोक्यावर येत असतो. ते दोन दिवस म्हणजे २१ मार्च व २३ सप्टेंबर हे होत. कारण या दोन दिवशीच सूर्य तंतोतंत पूर्वेला उगवतो, इतर दिवशी रोज तो किंचितसा तिरपा उगवत असतो.”


“सूर्य उगवतांना व मावळतांनाही सूर्यगोल मोठा का दिसतो?” आदित्यने प्रश्न केला.
“सूर्योदय व सूर्यास्ताच्या वेळी सूर्य हा क्षितिजावर असताना सूर्यप्रकाशाचा मार्ग हा जास्त लांबीचा व तिरपा असतो. पृथ्वीभोवतालचे वातावरण हे अनेक थरांनी बनलेले असते.


हे हवेचे थर वरच्या भागात विरळ असतात परंतु जमिनीजवळ धूर, धूलिकणांमुळे ते खूप दाट असतात. सकाळ-संध्याकाळी या तिरप्या सूर्यकिरणांना वातावरणातील अनेक जास्तीच्या वेगवेगळ्या थरांतून यावे लागते. त्यामुळे एका माध्यमातून दुस­ऱ्या अफाट नि घनदाट धूलिकणांच्या दाट माध्यमात येतांना त्यांचे वक्रीभवन झाल्यामुळे प्रकाशकिरणांचे थोडेसे प्रसरण होते व यावेळी सूर्यगोल आपणास इतर वेळेपेक्षा थोडासा मोठा भासतो. वास्तविक सूर्यगोलाच्या आकारात काहीच फरक पडत नाही, तो जेवढा आहे तेवढाच असतो.” त्याने स्पष्टीकरण दिले.


“सौरज्योत म्हणजे काय असते रे दोस्ता?” पिंटूने विचारले.
“सूर्याच्या बाह्य आवरणातील एखादा भाग जेव्हा त्यातील रासायनिक प्रक्रियांच्या प्रचंड उष्णतेमुळे अचानक अतिशय तप्त होतो तेव्हा तेथे ज्योतीसारखा प्रकाश दिसतो. त्यालाच सौरज्योत असे म्हणतात. अशी ज्योत सूर्यावरच्या डागाजवळ दिसत असते. या ज्योतीचे तेज तिच्या बाजूच्या भागापेक्षा कधीकधी पाचपट जास्त असते. सौरज्योत ही काही मिनिटांत निर्माण होते व बराच वेळ टिकून राहते. सूर्यावरचा प्रत्येक डाग किमान एक सौरज्योत निर्माण करतो. सौरडागाभोवती असलेल्या चुंबकीय क्षेत्राच्या परिणामाने तेथे सौरज्योत निर्माण होत असते. या ज्योतीतून अतिनील, क्ष-किरण व कॉस्मिक किरण बाहेर पडत असतात.


रोजच्याप्रमाणे शाळेची मधली सुट्टी संपली व त्यांची ज्ञानदायी बातचीत अपूर्णच राहिली. ते उठले व आपल्या वर्गाकडे जायला लागले.

Comments
Add Comment