विशेष: लता गुठे
मला नेहमी आकर्षित करणारा विषय म्हणजे पुरातन शिल्पकला. विविध लेण्यांमध्ये जेव्हा जेव्हा भेटते तेव्हा मला भिंतीवर कोरलेली शिल्पकला विशेष लक्ष खेचून घेते आणि ती पाहताना त्या कलाकाराचे मनोगत कौतुकही करते. आज या लेखांमध्ये ‘शिल्पातील नृत्यांगना’ अधोरेखित केल्या आहेत.
खरं तर शिल्पकला हा आपल्या भारतीय संस्कृतीचा ऐतिहासिक वारसा आहे आणि हा वारसा अगदी मोहेंजोदडो संस्कृतीचा इतिहास सांगतो. यामध्ये त्या काळातील प्रादेशिक, धार्मिक व सांस्कृतिक पैलू स्पष्ट केले असतात. आजही ते पाहताना डोळ्यांचे पारणे फिटते. इतिहास संशोधक शिल्पकलेकडे नेहमीच आकर्षित होतात आणि या कलेविषयी जास्तीत जास्त जाणून घेण्याचा प्रयत्न करतात. मी इतिहास संशोधक नाही; परंतु मला भारतीय संस्कृतीबद्दल विशेष आकर्षण असल्यामुळे या विषयात डोकावताना मला अनेक गोष्टींचे कुतूहल वाटते.
शिल्पकलेचे विविध नमुने आहेत. ही शिल्पकला मानवी संस्कृतीच्या उत्क्रांतीत आरसा आहे असे मी म्हणेन. प्राचीन शिल्प दगड, धातू, यापासून तयार केल्यामुळे ते वर्षांनुवर्ष टिकून आहे. कोणताही कलाकार त्याची अभिव्यक्ती व्यक्त करण्यासाठी साहित्य निवडत असतो ते साहित्य निवडताना त्याच्यासमोर विशिष्ट आकृतीचा प्लॅन असतो. नवनिर्मिती करताना तो त्या क्षणांचा विचार करत नाही, तर पुढील काळाचा विचार करतो. असेच शिल्पकलेच्या बाबतीतही आढळून येते.
दगडात कोरलेल्या नृत्यांगना पाहताना त्या कलाकाराने त्यांची निर्मिती करताना त्या शिल्पकलेतून केवळ सौंदर्यनिर्मिती केली तर त्या काळातील धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक जीवनाचा दस्तऐवज तयार केला. भारतीय शिल्पकला हे जगातील सर्वात प्राचीन व विविधतेने समृद्ध असे वैशिष्ट्यपूर्ण दालन आहे.
प्राचीन शिल्पकलेतील नृत्यांगना या सिंधू संस्कृतीतील शिल्पकलेचे उत्तम उदाहरण आहे. याच्या इतिहासाचा विचार केला, तर सिंधू संस्कृती (इ. स. पू. २६०० ते इ. स. पू. १९००) ही प्राचीन भारतातील जगप्रसिद्ध नागरी संस्कृती आहे. हडप्पा, मोहेंजोदडो, लोथल, कालीबंगन अशा ठिकाणी उत्खननातून मिळालेली विविध शिल्पकला, या सर्वांमध्ये मोहेंजोदडो येथून सापडलेली कांस्यनिर्मित “नृत्यांगना” मूर्ती ही सर्वात प्रसिद्ध व कलात्मकदृष्ट्या श्रेष्ठ मानली जाते.
मोहेंजोदडोतील नृत्यांगना पाहताना त्यांच्या विविध मुद्रा, त्यांच्या चेहऱ्यावरील भाव. शरीराची विशिष्ट पद्धतीने केलेली रचना. त्यांच्यातील सौंदर्य पाहताना आपले पाय एका जागेवर स्थिरावतात आणि त्यांना आपण डोळ्यांच्या दोन खिडक्यांमध्ये भरून घेतो. तेथील काही मूर्ती कांस्य या धातूतील छोटेखानी मूर्ती आहेत त्यांची उंची साधारण १०.५ से. मी. इतकी आहे. या मूर्तींची वैशिष्ट्य अशी आहेत. त्या शरीराचे नाजूक प्रमाणबद्ध, त्यांची कमरे खाली नेसवलेली विशिष्ट पद्धतीचे वस्त्र हालचालीतील चैतन्य. ही ‘नृत्यांगना’ म्हणजे मूर्तीमध्ये उभी असलेली एक तरुणी आहे. तिच्या चेहऱ्यावरील भाव निर्धास्त असून तिच्या उभे राहण्याच्या पद्धतीवरून तिच्यातील आत्मविश्वास तिच्या चेहऱ्यावर जाणवतो. जास्त निरखून पाहताना ती मला स्वातंत्र्य विचारांची आणि स्त्रीशक्तीचे उत्तम उदाहरण वाटते.
तिचा डावा हात कमरेवर टेकवलेला, उजवा हात सैल खाली असलेला आहे. ती सडपातळ, अंगाने प्रमाणबद्ध अशी आहे. तिच्या अंगावर अलंकार आहेत. हातात भरपूर बांगड्या, गळ्यात नाजूक अलंकार. तिची पारदर्शकता हीच त्या कलाकाराची खास कलादृष्टी आहे. अशा अनेक स्त्रियांच्या शिल्पाकृती आपल्याला पाहायला मिळतात. त्या पाहताना त्या वेळेचे तंत्रज्ञान व मुक्तपणे स्त्रियांचा असलेला वावर तिचं स्वातंत्र्य तिचा स्वाभिमान या सर्व गोष्टी त्यातून अधोरेखित होतात. ही शिल्प म्हणजे नृत्यकलेचा परंपरेचा पुरावा आहेत. मूर्तीतील मुद्रा नृत्याशी संबंधित असल्याने सिंधू संस्कृतीत नृत्य हा एक महत्त्वाचा कलाप्रकार असावा असे वाटते.
काही नृत्यांगनांचे शिल्प माती, मेन व लाकडापासूनही बनवता येते. त्यांच्या वेगवेगळ्या पोजेस. त्यांच्या शरीराचे आकार व त्यांचे अलंकार हेच या शिल्पांमध्ये विशेष आकर्षण असते. बदलत्या काळाबरोबर शिल्पाकृतींमध्येही अनेक बदल होत गेलेले आढळतात. यामध्ये त्यांचे वस्र, अलंकार यामध्ये बदल झालेला दिसत असला तरी या कलेचा पाया मात्र सिंधू संस्कृतीमध्ये दिसून येतो.
अशाप्रकारे आपल्याला विविध शिल्पकला पाहताना येणारे अनुभव हे सुख आणि आनंद देऊन जातात. एवढेच नाही तर इतिहासातील अनेक गोष्टी अधोरेखित करतात समजतात आणि या उज्ज्वल भारतीय संस्कृतीचे आपण वारसदार आहोत याचाही अभिमान वाटतो.
सारांश : भारतीय संस्कृतीतील विविध ठिकाणी असलेल्या ‘नृत्यांगना’ या सिंधू संस्कृतीतील सौंदर्यदृष्टी, तांत्रिक प्रावीण्य आणि स्त्रीच्या आत्मविश्वासाचे प्रतीक आहेत. आजही त्या भारतातीलच नव्हे, तर जगभरातील कलाप्रेमींना आकर्षित करतात आणि प्राचीन भारताच्या संस्कृतीच्या वैभवाची साक्ष देतात.