जम्मू आणि काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात रविवारी पहाटे ढगफुटीत किमान सहा जणांचा मृत्यू झाला आणि सहा जण जखमी झाले. कठुआ जिल्ह्यातील राजबाग परिसरातील घाटी गावात आणि जवळच्या दोन ठिकाणी ढगफुटीमुळे प्रचंड नुकसान झाले. अचानक आलेल्या पुरामुळे घाटी गावाचा जगाशी असलेला संपर्क तुटला. पोलीस आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दल यांनी तातडीने मदतकार्य सुरू केले.
घटनास्थळावरुन आतापर्यंत ६ मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. या व्यतिरिक्त घटनास्थळावरुन सहा जखमींना सुरक्षितरित्या बाहेर काढून पुढील उपचारांसाठी सुरक्षित ठिकाणी नेण्यात आले आहे.
काही दिवसांपूर्वी किश्तवाड जिल्ह्यात ढगफुटीच्या एका भीषण घटनेत ६० हून अधिक जणांचा जीव गेला होता.
कठुआ पोलिस स्टेशन हद्दीतील बगड आणि चांग्रा गावांमध्ये आणि लखनपूर पोलिस स्टेशन हद्दीतील दिलवान-हुटली येथे भूस्खलनाच्या घटना घडल्या, परंतु कोणतेही मोठे नुकसान झाले नाही.
मुसळधार पावसामुळे बहुतेक जलाशयांची पाण्याची पातळी झपाट्याने वाढली आहे आणि उझ नदी धोक्याच्या पातळीजवळून वाहत आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. जिल्हा प्रशासन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे आणि लोकांना जलाशयांपासून दूर राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.