
मुंबई: बिजू जनता दलाचे (बीजेडी) प्रमुख आणि ओडिशाचे माजी मुख्यमंत्री नवीन पटनायक यांना वयोमानाशी संबंधित आजारांमुळे पुन्हा एकदा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यापूर्वी सर्वीकल आर्थरायटीस आजाराने त्रस्त असलेल्या नवीन पटनायक यांवर मुंबईत मणक्याची यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना भुवनेश्वर येथील त्यांच्या निवासस्थानी विश्रांती घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला होता. मात्र, याला काही दिवस जात नाही, तोच नवीन पटनायक यांना पुन्हा रुग्णालयात दाखल केले गेले असल्यामुळे, त्यांच्या प्रकृतीबाबत त्यांचे हितचिंतक आणि समर्थक चिंता व्यक्त करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री नवीन पटनायक यांनी प्रकृती अस्वस्थतेची तक्रार केली होती. त्यानंतर डॉक्टरांची एक टीम त्यांच्या निवासस्थानी देखील दाखल झाली होती.
नवीन पटनायक यांच्यावर जूनमध्ये झाली शस्त्रक्रिया
२२ जून रोजी, ७७ वर्षीय नवीन पटनायक यांवर मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल आणि मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये मणक्याची शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. त्यांचे व्यक्तिगत, डॉ. रमाकांत पांडा यांनी ही शस्त्रक्रिया जवळजवळ चार तास चालली आणि ती "यशस्वी" झाल्याचे म्हटले होते. शस्त्रक्रियेनंतर पटनायक त्यांच्या भुवनेश्वर येथील नवीन निवासस्थानी पोहोचले होते, तेव्हा त्यांचे समर्थक आणि हितचिंतकांनी त्यांचे जोरदार स्वागत केले होते.