नॉस्टॅल्जिया: श्रीनिवास बेलसरे
पुणे जिल्ह्याच्या ओतूर गावी आजपासून बरोबर १०३ वर्षांपूर्वी एक मुलगा जन्माला आला. वैद्य कुटुंबात जन्माला आलेल्या त्या मुलाचे नाव ठेवण्यात आले-शंकर. नंतर शंकर वैद्य हे नाव अभिजात मराठी साहित्याच्या इतिहासात अपरिहार्य बनले. एक सिद्धहस्त कवी, व्यासंगी समीक्षक, विद्यार्थीप्रिय प्राध्यापक आणि पारदर्शी ‘चांगला माणूस’ म्हणून त्यांचे नाव नेहमीच घेतले गेले.
त्यांचे पहिले पुस्तक होते १९६० साली आलेला त्यांचा लघुकथासंग्रह ‘आला क्षण गेला क्षण’ तर दुसरे पुस्तक होते ‘कालस्वर’ हा १९७१ साली प्रकाशित झालेला त्यांचा पहिला कवितासंग्रह! स्वत:च्या विद्वत्तेबद्दल अजिबात गर्व नसलेल्या या नामांकित प्राध्यापकाने दुसरा कवितासंग्रह ‘दर्शन’ प्रकाशित केला तो थेट २७ वर्षांनी! त्यांच्या अनेक कविता अनेक मासिकात, दिवाळी अंकात प्रसिद्ध झाल्या, मात्र त्यांचा एकत्र कवितासंग्रह प्रकाशित न झाल्याने त्यांचे मोठे साहित्यधन दुर्लक्षित राहिले असेच म्हणावे लागेल. शंकर वैद्य प्रसिद्ध होते ते संत ज्ञानेश्वरापासून १९व्या शतकापर्यंतच्या अभिजात साहित्यिकांच्या अभ्यासासाठी! पण त्यांच्या लेखनात समीक्षेचा रुक्षपणा कधीच आला नाही. त्यांनी लिहिलेले शिवरायांच्या राज्याभिषेकावरचे रोमहर्षक गीत -
‘शतकांच्या यज्ञातून उठली एक केशरी ज्वाला,
दहा दिशांच्या हृदयामधुनी अरुणोदय झाला’
लतादीदींच्या आवाजात केवळ अजरामर झाले आहे!
‘पॅराडाइज लॉस्ट’साठी जॉन मिल्टनने वापरली होती तशी अतिभव्य शैली वैद्य फार सहज वापरत. भव्यतेने भारावून टाकणाऱ्या चित्रमय शैलीत त्यांनी काही कविता लिहिल्या. आपल्या तुकाराम महाराजांचे अभंग हे तसे उत्तम उपमा अलंकारांनी सजलेले अक्षर साहित्य! पण महाराजांनी मुद्दाम सोपे लिहिले कारण त्यांचा लेखनामागचा हेतू प्रबोधन हाच होता! तरी त्यांच्या काही रचना गूढ आहेत. “अणूरणीया थोकडा, तुका अकशाएवढा!” ही केवळ अभंगरचना नाही. तो एक गूढ अतींद्रिय अनुभव आहे. अशाच एका अनुभवाचे वर्णन करताना कविवर्य वैद्यांनी लिहिले होते -
‘आज हृदय मम विशाल झाले,
त्यास पाहुनी गगन लाजले.’
आकाश एका माणसाच्या हृदयाचे विशालपण पाहून लाजले? आकाशापेक्षा विशाल हृदय? कसे शक्य आहे? मुळात माणूस माणूस तो काय? आणि त्याचे मुठीच्या आकाराचे हृदय ते केवढे? त्याला पाहून आकाशाने लाजायचे? सगळेच अकल्पनीय! पण कवीने आपल्या सिद्धहस्त लेखणीने हा काहीसा अध्यात्मिक अनुभवसुद्धा सहजच कवितेत उतरवला होता. तीही केवळ एक कविता नव्हती. साधकाला येणारा एक अगदी पुढच्या पातळीवरचा अनुभव वैद्यांनी त्या अतिसंक्षिप्त कवितेत मांडलेला दिसतो. ते म्हणतात माझी जाणीव, माझी चेतना इतकी विस्तारली की ती आकाशात मावेना! माझ्यातून निघणारे किरण माझे हात झाले आणि मी अवघी पृथ्वी ओंजळीत घेतली! अवकाशात तळपणारा सूर्य मला माझ्या कपाळावरचे गंधच वाटू लागला! केवढी जबरदस्त कल्पना!
‘आज माझिया किरणकरांनी
ओंजळीमध्ये धरली अवनी,
अरुणाचे मी गंध लाविले,
आज हृदय मम विशाल झाले...’
असेच त्यांचे दुसरे एक गाणे पं. हृदयनाथ मंगेशकरांनीच स्वरबद्ध केले होते. गायक होते अरुण दाते. त्या गाण्याचे गूढरम्य शब्द श्रोत्याला वेगळ्याच जगात घेऊन जातात-
‘स्वरगंगेच्या, काठावरती,
वचन दिले तू, मला...
गतजन्मीची, खूण सापडे,
ओळखले का मला?
या, स्वरगंगेच्या, काठावरती
वचन दिले तू, मला...’
प्रियकराला त्याची काही जन्मापूर्वीच हरवलेली प्रेयसी अचानक सापडली आहे. जन्मजन्मांतरी ताटातूट झालेले प्रेमी अचानक या जन्मी भेटले आहेत. तो तिला आपली ओळख पटवून देण्याचा प्रयत्न करतो आहे. काहीसा फिल्मी वाटावा असा हा प्रसंग! पण अभिजात भाषेचे वैभव लाभलेला कवी कसा काल्पनिक अनुभवही रसिकांना खरा वाटायला लावू शकतो त्याचा हे गाणे म्हणजे एक उत्तम नमुना होते. कवी गतजन्मी गायक असावा. त्यामुळे तो म्हणतो स्वरांच्या गंगेकाठी आपण राहत होतो. तू मला आयुष्यभराच्या सोबतीचे वचन दिले होतेस. माझ्या डोळ्यांत बघ, तुला माझी ओळख पटते का? ते तुझे वचन तुला आठवते का?
मात्र प्रेयसीच्या चेहऱ्यावर ओळख काही उमटत नाही. मग दुष्यंताने ओळख नाकारलेल्या शकुंतलेसारखा कवी कावराबावरा होतो. तिला त्यांच्या गतजन्मीच्या संभाषणातील एकेक ओळ सांगून ओळख पटविण्याचा प्रयत्न करतो. ‘तूच तर म्हणाली होतीस-‘आपण तर जन्मोजन्मी भेटत आहोत. कधी मी सावित्री होते, कधी दमयंती, कधी मीच तर कण्वमुनींची कन्या शकुंतला होते आणि तू राजा दुष्यंत होतास.’ कवी आतुरतेने विचारतो ‘आठवते का तुला हे सगळे?’ त्याचा प्रांजळ प्रश्न अनुत्तरीत आहे.
इथे कविवर्य वैद्य केवळ प्राचीन प्रेमकथांचा उल्लेख करत नाहीयेत. कदाचित त्यांना एखादी अर्धवट राहून गेलेली, भंगलेल्या प्रेमाची शोकांतिकाही सांगायची नसावी. कारण ते म्हणतात, ‘नाव भिन्न तरी मी ती प्रीती.’ कविवर्य मानवी मनात, यौवनात स्वाभाविकपणेच फुलून येणाऱ्या शाश्वत प्रेमभावनेविषयी बोलताहेत. जीवन सुंदर करणाऱ्या एका चिरंतन अंत:प्रेरणेला साजरे करण्याचा त्यांचा मनोदय आहे. ते म्हणतात प्रेमभावनाच माणसाच्या मनात चैतन्याचा पूर आणते. ती इतक्या उत्कटपणे उसळत वाहू लागते की गंगेसारखी पवित्र नदीच होऊन जाते.
‘वदलीस तू ‘मी सावित्री ती’...
शकुंतला मी, मी दमयंती,
नाव भिन्न परि, मी ती प्रिती.
चैतन्याचा पूर तेधवा, गंगेला पातला.
स्वरगंगेच्या, काठावरती
वचन दिले तू मला...!’
पुनर्जन्माची संकल्पना भारतीय समाजमनात खोल रुचलेली आहे. चित्रपट जेंव्हा कृष्णधवल होते तेंव्हापासून अगदी परवापर्यंत अर्धवट राहून गेलेल्या प्रेमकथा दुसऱ्या जन्मात पूर्ण होण्याच्या कथानकाने आपल्याला अनेक लोकप्रिय सिनेमे दिले आहेत. वैद्य तशीच अधुरी प्रेमकहाणी सूचित करताना तिला अजून आर्त, हुरहूर लावणारी करून टाकतात. ‘आपण दोघे अनेक जन्म एकमेकाला शोधत फिरत आहोत. प्रिये, एकदा दुवा निखळला की पुन्हा भेट होणे किती अवघड असते! या जगडव्याळ पसाऱ्यात अगणित जीव ऋणानुबंधाच्या चक्रात फिरत आहेत. मी तर तुझ्या भेटीसाठी किती आतुर होतो. जणू मला तुझी तहान लागली होती. आजही मी तुझ्या प्रेमाचा भुकेला आहे. प्रिये, मला ओळख. तू घेतलेली जन्मोजन्मी साथ देण्याची शपथ आठव.
‘अफाट जगती, जीव रजःकण...,
दुवे निखळता, कोठुन मीलन?
जीव भुकेला, हा तुजवाचून,
जन्मांमधूनी, पिसाट फिरता,
भेट घडे आजला!
स्वरगंगेच्या, काठावरती
वचन दिले तू, मला...’
संपूर्ण गाणेच गतजन्मीच्या आठवणीत रेंगाळते. म्हणून तर हा नॉस्टॅल्जिया! ....आणि अशा हुरहूर लावणाऱ्या गाण्यांच्या आठवणी!