
मुंबई: भारतात बेकायदेशीर वास्तव्यासाठी नवी मुंबई येथून एका २१ वर्षीय बांगलादेशी महिलेला अटक करण्यात आली होती. जी गरोदर असल्यामुळे तिला उपचारांसाठी जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र ती महिला रुग्णालयातून फरार झाली असल्याची माहिती समोर येत आहे.
पाच महिन्यांची गर्भवती रुबीना इर्शाद शेख ही भारतात बेकायदेशीर रित्या राहणारी बांगलादेशी महिला असूनन, तिला पोलिसांनी अटक केली होती. दरम्यान प्रकृती अस्वस्थतेमुळे तिला मुंबईत जे जे रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी पोलिस घेऊन आले होते. तेव्हा एका कॉन्स्टेबलला धक्का देऊन या महिलेने रुग्णालयातून पळ काढला असल्याची प्राथमिक माहिती एका पोलिस अधिकाऱ्याने वृत्तसंस्थेला दिली.
अधिकाऱ्याने सांगितले की ती बांगलादेशी नागरिक आहे जिला ५ ऑगस्ट रोजी देशात बेकायदेशीर वास्तव्यासाठी नवी मुंबईतून ताब्यात घेण्यात आले होते. तिला भायखळा महिला तुरुंगात ठेवण्यात आले होते. तिला गेले काही दिवस ताप, त्वचारोग इत्यादी उपचारांसाठी तिला जेजे रुग्णालयात आणण्यात आले होते.
आशाप्रकारे पोलिसांना गुंगारा देऊन पळ काढल्यामुळे सदर महिलेवर भारतीय दंड संहितेच्या तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच, तिच्याविरुद्ध पासपोर्ट कायदा आणि परदेशी कायद्यांतर्गत आधीच गुन्हा दाखल आहे. सध्या तिचा शोध घेतला जात आहे.
या घटनेमुळे संपूर्ण शहरात शोधमोहीम सुरू झाली असून तिचा शोध घेण्यासाठी संपूर्ण मुंबईत पोलिस पथके तैनात करण्यात आली आहेत. अधिकाऱ्यांनी आश्वासन दिले आहे की तिला लवकरात लवकर अटक करण्यासाठी सर्व शक्य ते प्रयत्न केले जात आहेत.
भारत सरकारने बेकायदेशीररित्या वास्तव्यास असलेल्या बांगलादेशी नागरिकांवर कठोर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. या क्रमाने, हैदराबादमध्ये "बेकायदेशीरपणे" राहणाऱ्या वीस बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेऊन त्यांना परत पाठवण्यात आले आहे. ज्यांपैकी ९ पुरुष आणि ११ महिला आहेत. हे सर्वजण अनेक वर्षांपासून भारतात बेकायदेशीरपणे राहत होते.