Saturday, August 16, 2025

Devendra Fadanvis: “इतकी वर्ष लोणी कोणी खाल्लं?” पत्रकारांच्या थेट प्रश्नावर फडणवीसांचा झणझणीत टोला

Devendra Fadanvis: “इतकी वर्ष लोणी कोणी खाल्लं?” पत्रकारांच्या थेट प्रश्नावर फडणवीसांचा झणझणीत टोला

मुंबई : दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी वरळी जांबोरी मैदानातील परिवर्तन दहीहंडी उत्सवाला भेट दिली. या वेळी छावा चित्रपटातील एक प्रभावी दृश्य गोविंदांनी उभारलेल्या मानवी मनोऱ्याच्या माध्यमातून साकारण्यात आलं. या अद्वितीय दृश्याने प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले. याबाबत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, “छावा साकारलेला आहे. ज्या पद्धतीने छत्रपती संभाजी महाराजांचं शौर्य आमच्या गोविंदांनी मनोऱ्याच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचवलं, त्याबद्दल त्यांना मनापासून अभिनंदन. परिवर्तन दहीहंडी हा या परिसरातील अनेक वर्षांचा परंपरागत उपक्रम असून, तो आमच्या गोविंदांसाठी आकर्षणाचं केंद्र आहे. या उत्सवाचं उत्तम आयोजन केल्याबद्दल संतोष पांडे यांचेही विशेष अभिनंदन. आपल्या सर्वांना दहीहंडीच्या मनःपूर्वक शुभेच्छा.” प्रत्येक वर्षीप्रमाणे याही वर्षी विविध राजकीय नेते दहीहंडी उत्सवाच्या कार्यक्रमांना भेट देत असून, गोविंदपथकांच्या शौर्यपूर्ण प्रदर्शनाचा आनंद घेत आहेत.




दहीहंडी मंचावरून खाली उतरल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या प्रसंगी ते परिवर्तन दहीहंडीच्या माध्यमातून महानगरपालिकेतल्या परिस्थितीवर आणि विकासाच्या उद्देशांवर प्रकाश टाकत होते. मुख्यमंत्री म्हणाले, “महानगरपालिकेत परिवर्तन अटळ आहे. महानगरपालिकेतील पापाची हंडी आम्ही फोडली आहे. आता त्या ठिकाणी विकासाची हंडी लागेल. या विकासाच्या हंडीत जे काही लोणी आहे, ते जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आमचा असेल.” यावेळी त्यांनी आपल्या वक्तव्यात परिवर्तन, विकास आणि लोकहितासाठी केलेल्या प्रयत्नांवर भर दिला. तसेच त्यांनी दहीहंडीच्या प्रतीकात्मकतेचा उपयोग करून महानगरपालिकेतील सुधारणा आणि विकासात्मक उपक्रमांचे महत्त्व जनतेपर्यंत पोहोचवण्याचा संदेश दिला.




इतकी वर्ष लोणी कोणी खाल्लं?


जन्माष्टमी आणि दहीहंडीच्या सणाच्या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना “इतकी वर्ष लोणी कुठे जात होतं?” असा थेट प्रश्न विचारला.
याबाबत बोलताना फडणवीस म्हणाले, “कुठे जात होतं, तुम्हाला माहित आहे. तुम्ही माझ्या तोंडातून काढून घेण्याचा प्रयत्न करताय. पण जनतेला माहिती आहे, लोणी कोणी खाल्लं.”त्यांनी पुढे सर्वांना जन्माष्टमी आणि दहीहंडीच्या सणाच्या शुभेच्छा देत म्हटलं, “दहीहंडीचा सण आपण सर्वांनी उत्साहात आणि आनंदात साजरा करावा, ही माझी सर्वांना विनंती आहे.” यावेळी त्यांच्या वक्तव्यात थोडा रंजक आणि थेट संवादाचा टच होता, ज्यामुळे उपस्थित पत्रकारांमध्ये चर्चेची वातावरण निर्माण झाली.




‘उत्सवावरची सर्व बंधनं हटवली’


पुढे फडणवीस म्हणाले, “दहीहंडी आणि गणेश उत्सवावर पूर्वी काही बंधनं होती. ती सगळी बंधनं शिंदे साहेबांच्या सरकारच्या काळात हटवण्यात आली. आता आमचं सरकार असून, सर्व बंधन पूर्णपणे हटवण्यात आलेली आहेत. त्यामुळे सध्या प्रचंड उत्साह आहे आणि उत्साहात दहीहंडी साजरी होत आहे.” त्यांनी पुढे पावसावरही भाष्य केले, “रात्रीपासून पाऊस पडतोय, आजही पावसाचा अंदाज आहे. मात्र कितीही पाऊस पडला तरी गोविंदांच्या उत्साहाचा पाऊस त्यापेक्षा मोठा आहे.” या वक्तव्यांमधून त्यांनी दहीहंडी उत्सवाला दिलेल्या महत्त्वाबरोबरच, सणाच्या आनंदात राहणाऱ्या गोविंदपथकांच्या उत्साहाचं कौतुकही व्यक्त केलं.


Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >