
प्रथम घाटकोपर, आणि ठाण्यात दोनडा असे सलग तीनवेळा १० थर रचत केला महाविश्वविक्रम
ठाणे: जोगेश्वरीच्या जय जवान पथकाने दहा थर लावत केवळ विश्वविक्रम केला नाही तर एकाच दिवशी तीन वेगवेगळ्या ठिकाणी विश्वविक्रमाची हॅट्रिक देखील केली आहे. विशेष म्हणजे काही तासांच्या अंतरावर त्यांनी हा विक्रम रचला. सकाळी घाटकोपरमध्ये तर रात्री ठाण्यामध्ये दोन वेळा दहा थर लावल्याने जय जवान गोविंदा पथकाचे सर्वत्र कौतुक केलं जात आहे.
जय जवान पथकाने सकाळी घाटकोपर येथे मनसे गणेश चुक्कल, अरविंद गिते मित्र परिवार आयोजित दहीहंडीमध्ये १० थरांची दहीहंडी रचत स्वतःचे सामर्थ्य सिद्ध केले. त्यानंतर रात्री ठाण्यामध्ये प्रताप सरनाईकांच्या संस्कृती प्रतिष्ठानच्या दहीहंडीत १० थरांचा विक्रम रचला. त्यानंतर त्यांनी लगेचच मनसेच्या अविनाश जाधव यांच्या ठाण्यातील दहीहंडीत पुन्हा १० थर लावत हॅट्रिक साधली.
तत्पूर्वी, ठाण्यातील प्रताप सरनाईक यांच्या संस्कृती प्रतिष्ठानच्या दहीहंडीमध्ये कोकण नगर गोविंदा पथकाने १० थरांची सलामी दिली होती. त्यामुळे जय जवान पथकाला त्याने मागे टाकले होते, पण अगदी काही तासांतच घाटकोपरमध्ये जय जवान पथकानं तोच विक्रम करत पुन्हा आपलं वर्चस्व सिद्ध केलं. त्यानंतर ते तिथेच थांबले नाही, तर त्यांनी सलग तीन वेळा १० थरांचा विक्रम रचत दहीहंडीच्या उत्सवातले सरदार आम्हीच हा संदेशच जणू काही दिला.