
कपाळावर बसलेला विकसनशील राष्ट्राचा शिक्का पुसून आणखी दोन दशकांनी 'विकसित राष्ट्रा'चा किताब अभिमानाने मिळवण्याचा दृढ संकल्प केलेल्या राष्ट्राच्या नेत्याने आपल्या स्वातंत्र्य दिनाला जसं भाषण करायला हवं, अगदी तसंच भाषण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल लाल किल्ल्यावरून केलं. जगाची बदलती समीकरणं, वेगाने बदलत असलेलं तंत्रज्ञान, ऊर्जेचे बदलते स्त्रोत आणि स्वसंरक्षणासाठी देशाने अंगीकारलेली नीती या सर्वच महत्त्वाच्या मुद्द्यांचा ऊहापोह त्यांच्या दीर्घ भाषणात होता. मोदी यांनी काल तब्बल १०५ मिनिटं भाषण केलं. लाल किल्ल्यावरून पंतप्रधानांनी केलेल्या आतापर्यंतच्या भाषणातलं हे सर्वात दीर्घ भाषण होतं, असं सांगितलं जातं आहे. ते खरं-खोटं काहीही असो, ज्यांच्याकडे बोलण्यासाठी खूप सारे मुद्दे आहेत आणि ज्यांना ते यानिमित्ताने देशासमोर मांडायचे आहेत, त्यांचं भाषण दीर्घ होणारच! बदलतं तंत्रज्ञान आणि जगाची बदलती अर्थरचना हे आजचे कळीचे मुद्दे आहेत. संपूर्ण जग एका अस्थिर अवस्थेतून जात आहे. ही अस्थिरता केवळ हिंसक घटनांमुळे किंवा युद्धामुळे आलेली अस्थिरता नाही. जगाची अर्थरचनाच बदलते आहे. नव्या युगात युद्ध आता युद्धभूमीपेक्षा आर्थिक आघाडीवर होणार आहेत. एकेकाळी जगावर ब्रिटिशांचा एकछत्री अंमल होता. त्यांच्या साम्राज्यावरचा सूर्य ढळत नव्हता, असं जगाच्या कानाकोपऱ्यांत पसरलेलं त्यांचं साम्राज्य होतं. दुसऱ्या महायुद्धानंतर इंग्लंडच्या या अर्थसत्तेला सुरुंग लागला. अमेरिका ही नवी अर्थसत्ता उदयाला आली. आता ही अर्थसत्ताही डळमळीत होते आहे. सत्तेचा काटा आशिया खंडात सरकतो आहे, असं तज्ज्ञांचं मत आहे. त्यादृष्टीने चीनकडे पाहिलं जात आहे. भारतानेही सर्वाधिक वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेत तिसरं स्थान पटकावलं आहे. आणखी वरचा क्रमांक गाठण्याच्या दृष्टीने आपली वाटचाल सुरू आहे. म्हणजे आजच जगातील तीन मोठ्या अर्थव्यवस्थांपैकी दोन आशिया खंडातल्या आहेत. चीन आणि भारत हे दोन्ही देश अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने जगातील दोन महासत्तांत गणले गेले, तर भौगोलिक, आर्थिक दृष्टीने जगाची संपूर्ण रचना बदलून जाणार आहे. देशाचे पंतप्रधान म्हणून मोदी या स्थितीत काय भाष्य करतात, याकडे म्हणूनच संपूर्ण जगाचं लक्ष लागलं होतं. पाकिस्तान हा भारताचा परंपरागत शत्रू आहे. त्याला अमेरिका आणि चीन या दोन्ही प्रबळ महासत्तांची फूस आहे, हे जगजाहीर आहे. पाकिस्तानचं नेतृत्व राजकीय नाही. ते खऱ्या अर्थाने लष्करच करत असतं. लष्कराच्या नीतीकल्पना, विचारप्रक्रिया आणि निर्णयक्षमता या राजकीय नेतृत्वापेक्षा अगदी भिन्न असतात. कोणत्याही मार्गाने का होईना, पाकिस्तानला अण्वस्त्रसज्ज करण्यात आलं आहे, ही वस्तुस्थिती आहे. भारताच्या कुरापती काढून भारताला सतत संत्रस्त ठेवण्याची जबाबदारी काही महासत्तांनी पाकिस्तानवर सोपवली आहे. भारताने त्याविरुद्ध थोडा आक्रमक पवित्र घेतला, तरी लगेच भारताला पाकिस्तानच्या अण्वस्त्र सज्जतेची भीती घालण्याचं काम याच महासत्ता करत असतात. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भारत - पाकिस्तानबाबतची नीती गेल्या काही महिन्यांत पूर्ण उघड झाली आहे. पाकिस्तानला सांभाळून घेताना भारताला आर्थिक अडचणीत आणणाऱ्या ट्रम्प यांचा डावही आता स्पष्ट झाला आहे. त्यामुळे, पाकिस्तान आणि ट्रम्प यांना एकाचवेळी इशारा देणं आवश्यक होतं. मोदी यांनी तो आपल्या नेहमीच्या शैलीत स्पष्ट आणि खणखणीत शब्दांत दिला, हे बरं झालं. कोणत्याही राष्ट्राची ताकद त्याच्या राष्ट्रप्रमुखाच्या भाषेतूनच प्रतीत होत असते. मोदी यांची कालची भाषा या गृहितकाला पुष्टी देणारीच होती. अमेरिकेने आधी आयात कर आणि नंतर दंड रक्कम लावण्याची जी आगळीक केली आहे, त्याने दबून जाणारा भारत नाही. अमेरिकेच्या या पावलांनी भारताचं; भारतातल्या काही क्षेत्रांचं, त्यातल्या प्रमुख घटकांचं नुकसान होणार आहे, हे उघड आहे. भारताच्या सकल राष्ट्रीय उत्पादन आणि उत्पन्नावरही त्याचा दुष्परिणाम होण्याची शक्यता आहेच. पण, जेव्हा देशाच्या सार्वभौमत्वाचा प्रश्न येतो, तेव्हा अशा अडथळ्यांवर मात करण्यासाठी दुप्पट ताकदीने उभं राहावं लागतं. पूर्ण आत्मविश्वासाने नवे पर्याय शोधावे लागतात. मोदी यांच्या भाषणात हा निर्धार उघड झाला, हीदेखील तमाम भारतीयांसाठी खूप समाधान देणारी बाब ठरणार आहे.
अमेरिकेने सुरू केलेली आर्थिक दादागिरी आणि चीनबरोबरचं आपलं मर्यादित सख्य पाहता भारताला कधी नव्हे एवढ्या गांभीर्याने आत्मनिर्भरतेचा मंत्र जपावा लागणार आहे. देशाला जेव्हा धान्योत्पादनात स्वावलंबी होण्याची गरज होती, तेव्हा 'हरितक्रांती', त्याला जोड देण्यासाठी पशुपालनाची 'श्वेतक्रांती' आपण यशस्वी केली. मत्स्योत्पादन वाढवण्यासाठी 'नीलक्रांती'ची घोषणा झाली. पण, त्यात फार काही घडलं नाही. आता तंत्रज्ञान, विशेषतः संरक्षण सामग्री, खतं, औषध आणि ऊर्जा क्षेत्रात भारताला वेगाने आत्मनिर्भर होण्याची गरज आहे. मोदी यांनी त्यांच्या भाषणात या सगळ्याच क्षेत्रांचा ज्या प्राधान्याने आणि तपशीलवार उल्लेख केला, त्यावरून देशाचं नेतृत्व याबाबत किती सजग आहे, हे दिसून आलं. देशातील तरुणांना हेच मोठं आश्वासन आहे. देशाचे पंतप्रधान स्वातंत्र्यदिनी जे बोलतात, त्याची दखल विविध देशांत राजनैतिक पातळीवर घेतली जाते. देशाच्या क्षमतांविषयी जे बोललं जातं, ते देशातल्या नागरिकांच्या दृष्टीने महत्त्वाचं असतं. मोदी यांच्या भाषणात या दोन्ही गोष्टींचं भान होतं आणि भरभरून आश्वासनही होतं. देशाच्या ७९ व्या स्वातंत्र्य दिनाची हीच मोठी भेट म्हणावी लागेल.