
दहीहंडीच्या उत्सवासाठी लोकांची संभाव्य गर्दी पाहता हवामान खात्याचे घराबाहेर न पडण्याचे आवाहन
मुंबई: मुंबईत काल रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सामान्य जनजीवन विस्कळीत झाले आहे. सततच्या मुसळधार पावसामुळे अनेक भागात पाणी साचले आहे आणि वाहतूक व्यवस्था पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) मुंबईसाठी रेड अलर्ट आणि ठाणे आणि आसपासच्या जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जाहीर केला आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे अति मुसळधार पाऊस रात्रीपासून सुरू आहे.
दरम्यान विक्रोळी परिसरात दरड कोसळून दोन जणांचा मृत्यू झाला आहे आणि दोघे जखमी झाले आहेत. कुलाबा आणि सांताक्रूझमध्ये अनुक्रमे ४५.२ मिमी आणि ११.५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. जोरदार समुद्री वाऱ्यांमुळे मच्छिमारांना समुद्रात जाऊ नये असा सल्ला देण्यात आला आहे.

मुंबई: मुंबईत काल रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. या पावसामुळे आज पहाटे शनिवारी (दि. १६ ऑगस्ट) विक्रोळीतील पार्कसाईट या डोंगराळ परिसरात दरड कोसळली. ...
रेल्वे ट्रॅकवर साचले पाणी, रेल्वे वाहतूक व्यवस्था विस्कळीत
काल रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे हार्बल तसेच मध्य रेल्वे मार्गिकेवरील काही ट्रॅकवर पाणी साचू लागले आहेत. मुंबईतील कुर्ला आणि विद्याविहार दरम्यानच्या रेल्वे ट्रॅक पूर्णपणे पाण्याखाली गेले आहेत. रेल्वे प्रशासनाने पाणी काढण्यासाठी पंप लावले असले तरी पाण्याचा निचरा होत नसल्याचे दिसून येत आहे. ज्यामुळे लोकल ट्रेनची वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे. तसेच किंग्ज सर्कल, दादर, माटुंगा आणि सायन यांसारख्या सखल भागांमध्ये गुडघाभर पाणी साचल्यामुळे रस्ते वाहतूकही मंदावली आहे.
पुढील २४ तासांत मुसळधार पाऊसाची शक्यता असून, दहीहंडीच्या उत्सवासाठी लोकांची संभाव्य गर्दी पाहता हवामान खात्याने घराबाहेर न पडण्याचे आवाहन लोकांना केले आहे.
पुढील तीन ते चार दिवस मुंबई आणि कोकण प्रदेशासह इतर जिल्ह्यात मुसळधार पाऊस
महाराष्ट्रातील वाशिम आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पूरसदृश परिस्थिती आहे, तर बीडमधील जिल्हा रुग्णालयाचे जीर्ण छत कोसळल्याने एक रुग्ण जखमी झाला आहे. हवामान विभागाने इशारा दिला आहे की पुढील तीन ते चार दिवस मुंबई आणि कोकण प्रदेशासह देशाच्या इतर भागात मुसळधार पाऊस सुरू राहू शकतो.