Saturday, August 16, 2025

Rain update: महाराष्ट्रासाठी पुढील २४ तास अतिमुसळधार, रायगडमध्ये अतिवृष्टीची शक्यता, गरज असेल तरच घराबाहेर पडा

Rain update: महाराष्ट्रासाठी पुढील २४ तास अतिमुसळधार, रायगडमध्ये अतिवृष्टीची शक्यता, गरज असेल तरच घराबाहेर पडा

पुणे: गेली अनेक दिवस सुट्टीवर गेलेला पाऊस महाराष्ट्रात पुन्हा दाखल झाला आहे.  पुढील २४ तासांमध्ये महाराष्ट्रात अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.  बंगालाच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानं देशात पावसाचा जोर वाढला आहे. ज्याचा परिणाम म्हणजे महाराष्ट्रात देखील पुढील ५ दिवस पावसाचे वातावरण राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यानुसार महाराष्ट्रातील काही भागांमध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.

कोकण किनारपट्टीवर हाय अलर्ट 

मुंबई, ठाणे तसेच रत्नागिरी या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून, पालघरला पावसाचा येलो अर्लट जारी करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे रायगडमध्ये अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली असून पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

पश्चिम महाराष्ट्रातही पाऊस दाखल

राज्यात गेली कित्येक दिवस दडी करून बसलेला पाऊस पश्चिम महाराष्ट्राला देखील झोडपणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यानुसार शनिवारी पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली कोल्हापूर आणि पुणे या जिल्ह्यांमध्ये मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर घाट माथ्यावर अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.

मराठवाड्यात विजांच्या कडकडाटांसह पाऊस

मराठवाड्यात देखील जोरदार पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड आणि हिंगोली या जिल्ह्यांमध्ये वीजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता असून, उर्वरीत जिल्ह्यांमध्ये मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज आहे.

पुढील पाच दिवस अतिमुसळधार

विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये १८ आणि १९ ऑगस्ट रोजी अतिवृष्टीची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील अनेक भागांमध्ये जोरदार पाऊस सुरू असल्यामुळे नद्यांच्या पाणीपातळीत पुन्हा एकदा वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे.

Comments
Add Comment